कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढत आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री असलेले सतेज पाटील यांना सहज वाटणारी निवडणूक आता मात्र चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण भाजपानं शौमिका महाडिक यांना पाटलांच्याविरोधात उभा करण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाडिकांच्या शिरोलीत जाऊन ही उमेदवारी दिल्याचे समजत आहे. याबाबत अधिकृत घोषणा आजच मुंबईत होण्याची शक्यता आहे. शौमिका महाडिक या झेडपीच्या माजी अध्यक्षा आहेत तसेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या त्या सुन आहेत.
कोल्हापूर विधान परिषदेच्या एका जागेसाठी आघाडीकडून सतेज पाटलांची उमेदवारी निश्चित आहे. सत्ताधारी असल्याने ही निवडणूक सतेज पाटील सहज जिंकता येईल अशी चर्चा असतानाच भाजपानं ही निवडणूक रंगतदार केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात वेगवेगळ्या बैठका घेत आहेत. अशाच एका बैठकीत शौमिका महाडिक यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. जनसुराज्यचे आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे तसेच महाडिकांच्या घरातली मंडळीही या बैठकीला उपस्थित होती. याच बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी काल शिरोलीत जाऊन शौमिका महाडिक यांचे सासरे महादेवराव महाडिक आणि इतर कुटुंबियांशी चर्चा केली.
शौमिका महाडिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी कोल्हापूरात आमचं ठरलंय हा शब्द आता आवडीचा झाला आहे. त्यामुळेच राहुल आवाडे हे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे. भाजपने तसा शब्दही दिल्याचं त्यांच्याकडूनही सांगितलं जातं. त्यामुळेच शौमिका महाडिक की राहुल आवाडे अशी चर्चाही अधिकृत उमेदवारी जाहीर होईपर्यंत सुरू राहील असं दिसत आहे.