काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर, 84 सदस्यांमध्ये देशभरातील 15 महिलांना संधी
मल्लिकार्जून खर्गे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 8 सदस्यांचा समावेश आहे तर देशभरातील 15 महिलांना कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.;
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर आता काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यातील 84 सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील 8 नेत्यांचा समावेश आहे. तर देशभरातील 15 महिलांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसने आपल्या सर्वोच्च कार्यकारी समितीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश केला आहे. तसेच कार्यकारी सदस्यांसोबतच काँग्रेसने विशेष आणि स्थायी आमंत्रित सदस्यांचीही निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून मुकूल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, रजनी पाटील, चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे.
देशभरातील १५ महिला कोण?
सोनिया गांधी
प्रियंका गांधी- वाड्रा
आंबिका सोनी
मीरा कुमार
कुमारी सेलजा
दीपा दास मुन्शी
प्रतिभा सिंह
मीनाक्षी नटराजन
फुलो देवी नेतम
रजनी पाटील
यशोमती ठाकूर
प्रणिती शिंदे
अलका लांबा
सुप्रिया श्रिनेत
काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी यासोबतच दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यंदा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्राचं वजन वाढल्याचं पहायला मिळत आहे.
सोनिया गांधी अध्यक्ष असताना बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य होते. मात्र आता मल्लिकार्जून खर्गे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अविनाश पांडे आणि मुकूल वासनिक या महाराष्ट्रातील सदस्यांचे राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान कायम राहिले आहे.
G-23 मधील थरूर आणि आनंद शर्मा यांचाही या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.