शरद पवार यांच्याबद्दलची खोटी बातमी आली अंगलट, News18 Lokmat ने व्यक्त केली दिलगिरी
शरद पवार आपल्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत आहेत. त्यातच शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगर नाही औरंगाबादच बोलणार, असे म्हटल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. त्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. मात्र आता या वादात आणखी मोठा ट्विस्ट आला आहे.
शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना मी छत्रपती संभाजीनगर नाही औरंगाबादच म्हणणार असल्याचे वृत्त News18 Lokmat या चॅनलने दिले होते. त्यानंतर सोशल मीडियावर शरद पवार यांच्याविरोधात मोहिम चालवली गेली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी शरद पवार यांनी असे वक्तव्य केले नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर ज्यांनी शरद पवार यांच्याबद्दल अफवा पसरवल्या. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. त्यानंतर आता अखेर News 18 Lokmat या चॅनलने ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली आहे.
न्यूज 18 लोकमतने ट्विट करून म्हटले आहे की, एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते, अशी अनवधानाने बातमी दिली होती. शरद पवार हे असे म्हणाले नव्हते, असं म्हणत अनवधानाने दिलेल्या बातमीबद्दल दिलगिरी असं न्यूज 18 लोकमतने म्हटले आहे.