शरद पवार या माणसाने कधी शिवछत्रपतींचं नाव घेतलं का?, राज ठाकरे यांचा सवाल
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला आहे. त्यातच राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना या माणसाने कधी शिव छत्रपतींचं नाव घेतलं का? असा सवाल उपस्थित केला.
राज ठाकरे रत्नागिरी येथे बोलत असताना म्हणाले, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा काढण्यात आला. मात्र मी नेमकं काय बोललो ते बाजूला ठेऊन माझा स्मारकाला विरोध असल्याचं पसरवलं.
पण खरंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या माणसाने कधी शिवछत्रपतींचं नाव घेतलं आहे का? त्यांच्या तोंडी शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव यायचं पण शिवछत्रपतींचं नाव आलं नाही. शाहू, फुले, आंबेडकर मोठे होतेच. पण तरीही कधीही शिवछत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांनी माझ्याबद्दल गैरसमज पसरवले होते.
माझं एवढंच म्हणणं होतं की, राज्यात अनेक पुतळे आणि स्मारकं आहेत. मात्र जयंती-पुण्यतिथीनिमीत्त या पुतळ्यांना हार घालणं एवढंच काम उरतंय, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले, शिवछत्रपतींच्या समुद्रातल्या स्मारकापेक्षा गडकिल्ले दुरुस्त करा, असं मी म्हटलं होतं. कारण गडकिल्ले ही उद्याची स्मारकं आहेत. त्यामुळे ही जपली पाहिजेत. नाहीतर उद्याच्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवणार आहोत का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.