पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. तसेच बुधवारी त्या शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राजकीय दृष्ट्या ही भेट महत्त्वाची असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि राष्ट्रीय राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावेत अशी प्रार्थना आपण सिद्धिविनायकाला केल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
"ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एका वाघिणीसारखी झुंज दिली आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावलं, ते पाहता संपूर्ण देश आज ज्या प्रमुख नेत्यांकडे पाहतो आहे, त्यांच्यामध्ये ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवार यांची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील तितकीच महत्त्वाची आहे, ममतादीदी जर पवारांना भेटीत असतील तर ते नक्कीच स्वागतहार्य आहे." असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.