Congress President : 24 वर्षानंतर गांधी परिवाराबाहेरचा नेता होणार काँग्रेसचा अध्यक्ष, थरुर की खर्गे आज फैसला
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत शशी थरूर विरुध्द मल्लिकार्जुन खर्गे (Shashi Tharoor vs Mallikarjun Kharge) सामना रंगला होता. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान झाले. त्यानंतर आज सकाळी 10 पासून काँग्रेस मुख्यालयात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे काँग्रेसचं अध्यक्षपद शशी थरूर यांच्याकडे जाणार की मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी सोनिया गांधी(soniya Gandhi), राहुल गांधी(Rahul Gandhi), माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Dr. Manmohan Singh) यांच्यासह साडे नऊ हजार निवडणूक मंडळाच्या सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे आज लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खर्गे यांचे पारडे जड
मल्लिकार्जुन खर्गे हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे शशी थरूर यांच्या तुलनेत मल्लिकार्जुन खर्गे यांचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. मात्र शशी थरूर हेसुध्दा आघाडी घेऊन धक्का देऊ शकतात, असाही दावा केला जात आहे.
थरूर G23 गटातील नेते
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या G23 गटांतील शशी थरूर एक नेते आहेत. त्यामुळे त्यांचा मार्ग अवघड असल्याचे म्हटले जात आहे. मात्र बदल स्वीकारण्याची हिंमत ठेवत असल्याचे थरुर यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपदी शशी थरूर बसणार की मल्लिकार्जुन खर्गे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गांधी घराण्याबाहेरचे काँग्रेस अध्यक्ष (Congress President outside of Gandhi-Neharu family)
काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र गांधी-नेहरू घराण्याव्यतिरीक्तही काही काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 मध्ये भोगाराजू पट्टभी सितारामय्या यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
1950 मध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन हे होते.
1951 ते 1955 मध्ये पंडित नेहरु अध्यक्ष होते. त्यानंतर यु एन ढेबर हे 1959 पर्यंत अध्यक्ष होते.
1959 मध्ये काही काळापुरत्या इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्यानंतर 1960 ते 63 या काळात नीलम संजीव रेड्डी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1964 ते 1967 या काळात दक्षिणेतील के. कामराज हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1968-70 या कालावधीत एस निजलिंगप्पा हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1970 ते 72 या कालावधीत जगजीवनराम हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1972 ते 1975 या कालावधीत जगजीवनराम हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1972-75 या कालावधीत शंकर दयाळ शर्मा हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1975-77 या कालावधीत देवकांता बरुओ हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1977 ते 78 या कालावधीत कासू ब्रम्हानंद रेड्डी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1978 ते 91 या दरम्यान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र त्यानंतर 1992 ते 1996 या कालावधीत पी नरसिंह राव हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1996 ते 1998 सिताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1998 ते 2022 पर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी अध्यक्ष होते. मात्र आज काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यामध्ये शशी थरूर विरुध्द मल्लिकार्जून खर्गे विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.