संजय राऊत यांना अटक होणार
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर संजय राऊत यांना अटक होणार असल्याची चर्चा आहे.;
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत भाजप नेत्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यादरम्यान राऊत यांना ईडीचे समन्स आले. तर आता संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र आपल्या पक्षाच्या काही कार्यक्रमामुळे चौकशीसाठी हजर होता येणार नसल्याचे संजय राऊत यांनी ईडीला कळवले होते. तसंच संजय राऊत यांनी ईडीने त्यांना वाटेल तिथून मला अटक करावी, असंही आव्हान दिले होते. मात्र त्यानंतर आता संजय राऊत यांनी ट्वीट करून मी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील राजकीय सत्तासंघर्ष टोकाला पोहचला असताना संजय राऊत यांना 27 जून रोजी ED चे समन्स आले होते. त्यानंतर संजय राऊत आक्रमक होत ईडीला वाटेल तिथून त्यांनी अटक करावी, असं म्हटलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशीसाठी आज हजर होणार असल्याचे म्हटले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासामध्ये 1 हजार 39 कोटी 79 लाख रुपयांचे मनी लाँडरींग केल्याचा आरोप करत 2018 मध्ये संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि गुरू आशिष कन्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रविण राऊत, राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरोधात म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी ही तक्रार दिली होती. या प्रकरणात ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात राकेश वाधवान यांच्या एचडीआयएल कंपनीने 100 कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या खात्यात वळवल्याचे ईडीच्या चौकशीत दिसून आले. तर प्रवीण राऊत यांनी हा पैसा मित्र, कुटूंब आणि नातेवाईकांच्या खात्यात पाठवल्याचे ईडीने म्हटले आहे. तर या पैशातील 83 लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी आणि संजय राऊत यांची पत्नी यांच्या खात्यात पाठवल्याचे ईडीने म्हटले. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यापुर्वीही संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर फुलवाल्याचे आणि केटरिंगवाल्याची चौकशी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी ईडीने नोटीस पाठवली होती. तर 27 जून रोजी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स पाठवले होते. मात्र संजय राऊत चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. मात्र आता संजय राऊत चौकशीला हजर झाल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.