संजय राऊत चंद्रकांत पाटील वाद रंगला, दोघांनीही एकमेकांसाठी केल्या पार्थना

Update: 2022-01-18 07:22 GMT

Photo courtesy : social media

मुंबई : भाजप महाविकास आघाडीत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. त्यातच पाच राज्यांच्या विधानसभांमुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. तर शिवसेना भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहे. त्यातच गोवा निवडणूकीवरून शिवसेना खासदार संजय राऊत भाजपावर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. तर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रार्थना करत म्हटले की, ईश्वर त्यांना सुबुध्दी देवो.

राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीतील वाक् युध्द चांगलेच रंगले आहे. तर गोव्यातील निवडणूकीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपची भंबेरी उडवली आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर चंद्रकांत पाटील यांनी धमक असेल तर संजय राऊत यांनी गोव्यातून निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले होते. त्यावरून संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारल्याच्या बातम्यांवर संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देतांना संजय राऊत यांनी गोव्यातून निवडणूक लढवावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तर पंतप्रधान गुजरातमधून नाही तर उत्तरप्रदेशातून निवडणूक लढतात आणि जिंकतात. तसंच संजय राऊत यांनी गोव्यातून निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावं, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यावरून संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

संजय राऊत प्रत्युत्तर देतांना म्हणाले की, सगळीच येड्यांची जत्रा. संजय राऊत यांनी गोव्यातून निवडणूक लढवावी, इति चंद्रकांत पाटील..कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीत नाव असणे गरजेचे असते. एवढे भाजप नेत्यांना माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते. ईश्वर त्यांना सुबुध्दी देवो, असे म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना सुबुध्दी मिळावी यासाठी प्रार्थना केली.

संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटनंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, संजय राऊत यांचे नाव महाराष्ट्राच्या यादीत आहे, पण महाराष्ट्रातही त्यांची निवडणूक लढवण्याची कधी हिंमत झाली? माझ्या वक्तव्यातील व्यंग कळू नये, हे तुमच्यासारख्या पत्रकारासाठी मोठे दुर्दैव आहे. पण असो इतर राज्यातील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल या तणावात होत असेल कदाचित. लवकर बरे व्हा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Tags:    

Similar News