औरंगजेब तुमचा काय नातेवाईक झाला आहे का? संजय राऊत संतापले

Update: 2022-07-15 07:22 GMT

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचे सत्र सुरू आहे. त्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन होताच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यासह वेगवेगळे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडले.

संजय राऊत म्हणाले की, ठाकरे सरकारने औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिलं. पण हे निर्णय रद्द केले हे खरं असेल तर हे सरकार हिंदूद्रोही आणि महाराष्ट्र द्रोही आहे हे स्पष्ट होईल. त्याबरोबरच विरोधात असताना औरंगाबादचं नाव संभाजीनगर कधी करता असा सवाल भाजपकडून विचारला जात होता. उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतही त्यांची तीच भुमिका होती. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी हे लोक मोर्चे काढत होते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी केंद्राची पर्वा न करता हिंमतीने आणि लोकभावनेचा आदर करून औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले होते. मात्र फडणवीस आणि शिंदे सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर त्यांच्यासारखे ढोंगी लोक कोणी नाहीत, अशी टीका केली.


Full View

संजय राऊत म्हणाले की, मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांना निर्णय फिरवण्याचा अधिकारच नाही. तसंच पुढं बोलताना राऊत म्हणाले की, हे निर्णय बदलून फडणवीस यांनी काय साध्य केलं हे त्यांना विचारायला हवं. कारण मुख्यमंत्र्यांच्या हाती काहीच नाही. याबरोबरच एकीकडे शिवसेनेने हिंदूत्व सोडल्याचा आक्रोश करता आणि दुसरीकडे असे निर्णय बदलता, असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.

जर राजकीय निर्णय जर बदलले असते तर मी समजू शकलो असतो. मात्र औरंगाबादचं नाव हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे हा निर्णय बदलला असेल तर औरंगजेब अचानक कसंकाय तुमचा नातेवाईक झाला? उस्मान तुमचा कोण लागतो? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

संसदेत काही शब्दांवर निर्बंध आणली असल्याच्या निर्णयाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, स्वतःचे डाग पुसण्यासाठी मोदी सरकारने हे केलं आहे. त्यामुळे संसदेत यापुढे काहीहीच करता येणार नाही, हात पाय बांधून तोंडावर चिकट पट्ट्या बांधून आम्हाला जावं लागणार आहे. यादेशात आणिबाणी पेक्षा जास्त भयानक स्थिती आहे, असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

शिंदे-फडणवीस सरकारने आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही आणीबाणीविरोधात लढत असून तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला. काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांची स्वतंत्र विदर्भाची मागणी जुनीच आहे. मात्र आशिष देशमुख सध्या आमच्यासोबत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Tags:    

Similar News