राज्यसभा निवडणुकीत संजय पवार यांचा झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला शब्द दिला पण दगाबाजी केली, त्यांची नावं आमच्याकडे आहेत, या शब्दात संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले की, "घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, " असा टोलाही राऊतांनी विरोधकांना लगावला. "समोरच्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला. घोडेबाजार जे विकले गेले त्यांची नोंद झाली आहे. काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही. मात्र हा काही भाजपचा मोठा विजय नाही, " असंही ते म्हणाले. ज्या लोकांनी शब्द दिला ते शब्द पाळतील पण त्यांनी ते पाळले नाहीत, असंही ते म्हणाले.
बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, आमदार संजय मामा शिंदे, देवेंद्र भुयार, नांदेडचे आमदार शिंदे यांनी शब्द देऊनही शिवसेनेला मतदान केले नाही, असा आरोपा संजय राऊत यांनी केला आहे. "संजय पवार यांच्या पराभवानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपनं पैशांचा पाऊस पाडला. संजय पवार हे उत्तम रित्या लढले. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्ष ठेवत असतो, " असंही ते म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या दोन जागा निवडून येतील. राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून येतील आणि काँग्रेसचा देखील एक उमेदवार निवडून येईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचं मत बाद केलं. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला. मात्र फक्त कांदेंचं मत अवैध ठरवलं. रवि राणा यांनी देखील जे कृत्य होतं त्यांचंही मत अवैध व्हायला हवं होतं, असंही राऊत म्हणाले. इतर मतंही बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो डाव आम्ही हाणून पाडला असंही राऊत म्हणाले. पण सुहास कांदे यांनी आपल्याविरोधातील निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.