भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक, संजय राऊत यांचा टोला कुणाला?

Update: 2022-07-24 07:32 GMT

राज ठाकरे यांनी आजारपणानंतर दिलेल्या मुलाखतीत उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचा लाऊडस्पीकर असा उल्लेख केला. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत प्रचंड आक्रमक झाले आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनीही आजारपणानंतर प्रथमच झी 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक निलेश खरे यांना मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांचा लाऊडस्पीकर असा उल्लेख केला. त्यावर प्रत्युत्तर देतांना संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले की, त्यांना देखील माझा लाऊडस्पीकर ऐकावा लागत आहे. एके काळी सरकार कधी पडणार याच्या पिपाण्या वाजवल्या जात होत्या. मात्र आमचा लाऊडस्पीकर महाराष्ट्राचा आवाज आहे. त्यामुळे भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक असल्याचे म्हणत अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे आणि प्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी टोला लगावला का? अशी चर्चा रंगली आहे.

लाऊडस्पीकर हा 56 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे तुम्ही फक्त सरकार सांभाळा. कारण सरकार लवकरच अंतर्गत कलहाने पडणार आहे. हे सरकार टिकणार नाही. त्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीत जा, असंही संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्या शिवाय राहणार नाही मिस्टर फडणवीस. तसेच तुम्ही ईडी, सीबीआय माझ्या मागे लावा. त्यांनी लक्षात घ्यावं त्यांची अने कटकारस्थाने माझ्याकडे आहेत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

पुढे चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेऊन शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी कोल्हापूरच पाणी दाखवलं. त्यांच्या पोटात जे मळमळत होतं ते ओठावर आलं.


Full View

Tags:    

Similar News