प्रकाश आंबेडकर - उध्दव ठाकरे युतीनंतर चार दिवसातच उडाला पहिला खटका

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात चारच दिवसांपुर्वी युती झाली होती. मात्र पहिल्या चारच दिवसात युतीत पहिला खटका उडाल्याचे पहायला मिळाले.;

Update: 2023-01-27 06:51 GMT

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्यात गेल्या चार दिवसांपूर्वी युती युती झाली होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एका मंचावर पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. पण चार दिवसातच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये खटके उडायला सुरवात झाली आहे.

शरद पवार (Sharad pawar) हे भाजपचेच आहेत, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash Ambedkar) यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी सावध प्रतिक्रीया दिली. मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. त्याबरोबरच संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीची (Shivsena-Vanchit Bahujan Aghadi Allience) चार दिवसांपुर्वी युती झाली. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्याविषयी प्रकाश आंबेडकर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे आम्हाला मान्य नाही, असं संजय राऊत यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार भाजपचे आहेत, असे म्हणणे म्हणजे शरद पवार यांच्या कारकीर्दीवर प्रश्न निर्माण करणारे आहे. जर शरद पवार भाजपचे असते तर महाराष्ट्रात अडीच वर्षापुर्वी भाजपचे सरकार असते. भाजपला सत्तेपासून दूर ठेऊन शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग करत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला, असं संजय राऊत म्हणाले.

प्रकाश आंबेडकर अशा प्रकारच्या भूमिका घेतांना यांनी शब्द जपुन वापरावे, असा सल्ला सुद्धा संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला. भुतकाळातील मतभेद आपल्याला दुर ठेवले पाहिजेत, असा सल्लाही राऊत यांनी आंबेडकर यांना यावेळी दिला.

युती होवून अजून चार दिवसही झाले नाहीत आणि आत्तापासूनचं वचित व शिवसेनामध्ये खटके उडायला सुरवात झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी टिकेल का? यावरच प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

Tags:    

Similar News