'तुम्हाला राज ठाकरेंनी कारकुनाचा संपादक केला हे विसरू नका', संदीप देशपांडे यांचा संजय राऊत यांना टोला
गुवाहाटी ला गेलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांवर सध्या संजय राऊत आणि आदित्य ठाकरे बोचरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. संजय राऊत तर एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला तर इतरांना पानवाला, वॉचमन आशा पद्धतीने संबोधत आहेत. यावरून संजय राऊत यांना आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जुनी आठवण काढत टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड कोपरी विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलं. ते एकटेच गुवाहाटीला गेले नाहीत तर त्यांच्या सोबत शिवसेनेचे 40 आणि काही अपक्ष असे जवळपास 50 आमदार घेऊन गेले. नेहमीच माध्यमांमधून चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत हे सातत्याने या आमदारांवर टीका करत राहिले. बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंपासून लांब जाणाऱ्या कारणांमध्ये एक संजय राऊत देखील आहेत अशा देखील चर्चा आहेत.
दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला ,भाजी विकणारा ,वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभा मध्ये कारकून होते तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामना चे संपादक बनवलं
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 28, 2022
या बंडखोर आमदारांवर संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. एकनाथ शिंदेंना रिक्षावाला तर संदीपान भुमरे यांना वॉचमन शिवाय मंगेश कुडाळकर यांना दारुवाला अशा नावांनी संबोधत टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेची खिल्ली उडवण्याचा काम मनसे नेते संदीप देशपांडे करताना दिसतायत. संदीप देशपांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करत संजय राऊत यांना त्यांच्या जुन्या कामाची आठवण करून दिली आहे.
"दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला ,भाजी विकणारा ,वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभा मध्ये कारकून होते तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामना चे संपादक बनवलं" असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. आता यावर संजय राऊत के प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.