संभाजी राजे यांची मोठी घोषणा, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार

Update: 2022-05-12 08:30 GMT

संभाजीराजे भासले यांनी 12 मे रोजी मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर संभाजी राजे यांनी अखेर राज्यसभेची निवडणूक आणि नव्या संघटनेबाबत मोठी घोषणा केली आहे. खासदार संभाजी राजे यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यापार्श्वभुमीवर संभाजी राजे यांनी 12 मे रोजी पुण्यातून मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर संभाजी राजे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्यसभेची निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

संभाजी राजे यांनी यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तर त्यानंतर मी 2007 पासून समाजकारणात काम करत असल्याचे संभाजी राजे म्हणाले. तसेच पुढे बोलताना संभाजी राजे म्हणाले की, मी राज्यसभेत सदस्य म्हणून काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत राहिलो. मी शाहू महाराजांची जयंती दिल्लीत सर्वप्रथम सुरू केली. शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा रायगडावर सुरू केला, असे संभाजी राजे म्हणाले.

संभाजी राजे यांनी जाहीर केली राजकीय भुमिका

संभाजी राजे यांनी सांगितले की राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण मी आतापासून कोणत्याही पक्षाशी संबंधीत असणार नाही. मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार आहे. तसेच संभाजी राजे यांनी राजकीय भुमिका जाहीर करताना स्वराज्य नावाची नव्या संघटनेची घोषणा केली. तर या संघटनेच्या विस्तारासाठी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे म्हटले. त्यानंतर स्वराज्य ही संघटना काही काळातच राजकीय पक्ष म्हणून पुढे आला तर आश्चर्य वाटू नये, असे संभाजी राजे यांनी यावेळी सांगितले.

संभाजी राजे यांच्या भुमिकेबाबत इतर राजकीय पक्षांनी मांडली होती भुमिका

संभाजी राजे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजी राजे नेमकी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील आणि संभाजी राजे यांच्यातील जवळीकही या काळात वाढत होती. त्यापार्श्वभुमीवर संभाजी राजे यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर सतेज पाटील यांनी दिली होती. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रवादीत यावं. त्यांचे स्वागत केले जाईल, असे म्हटले होते. त्यामुळे संभाजी राजे हे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र संभाजी राजे यांनी नव्या संघटनेची घोषणा करत आपण राज्यसभेची जागा अपक्ष लढवणार असून सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी संभाजी राजे यांनी केले.

राज्यसभेच्या निवडणूकीसाठी काय आहेत समीकरणे

सध्या महाराष्ट्रातील सहा राज्यसभेचे सदस्य हे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात भाजपच्या वाट्याला दोन जागा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येईल. मात्र सहावी जागा रिक्त राहणार आहे. तर या जागेवर संभाजी राजे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. तर या जागेवर निवडून येण्यासाठी एकूण 42 मतांची गरज आहे. त्यापैकी 22 मतं ही भाजपकडे तर 27 मतं महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे या जागेवर संभाजी राजे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

Tags:    

Similar News