पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या समंतीशिवाय झालाच नाही- सदाभाऊ खोत यांचे स्पष्टीकरण
राज्याच्या राजकारणत दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यावर आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. शरद पवार यांची समंती असल्याशिवाय पहाटेचा शपथविधी झालाच नाही, असे स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिले आहे.
पहाटेच्या शपथविधीवरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा शपथविधी ही शरद पवार यांची खेळी असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यादरम्यान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथ विधी होऊ शकत नाही. कारण आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित दादा निर्णयच घेऊ शकत नाहीत, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले की, शेतामध्ये जेव्हा पीक येते तेव्हा पीक आल्यानंतर तिथे राखणदार बसवला जातो. तो बसवला की तो पाखरांना पिकाजवळ येऊ देत नाही. मग पाखरांना प्रश्न पडतो की पिकांवरील दाणे कसे खायचे. पाखरे सुद्धा हुशार असतात. ती १, २ दिवस शेताजवळ फिरकत सुद्धा नाहीत. आणि राखणदाराला वाटते आता पाखरे येणे बंद झाले आहे आणि राखणदार झोपून जातो. पण एकदिवस अचानक ही पाखरं भरलेल्या शेतातील पिकांवर हल्ला करतात आणि शेतातील सर्व दाणे खाऊन मोकळे होतात. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागली की, पाखरू रूपी पवार साहेबांना कळले की, आता आपल्याला थोडे शांत राहावे लागेल. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाल्यांना सांगितले की, मी येतो तुमच्या बरोबर आणि मग पहाटेचा शपथविधी पार पडला, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
अजित दादा येतील त्यांच्यासोबत उद्या पहाटेचा शपथविधी उरकून घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. त्यामुळे राज्यात लागू होणारी राष्ट्रपती राजवट उठवली आणि राखणदार गेला की बरोबर दुसऱ्या दिवशी पवार साहेब यांनी सेनेला आणि काँग्रेसला घेऊन राज्यात नविन सरकार स्थापन केले. हा डाव साधण्यात शरद पवार सर्वांना परिचित आहेत. हे त्यावेळी सर्वांच्या लक्षात आले, असे खोत यावेळी म्हणाले. राखणदाराला घालवण्यासाठी शरद पवार यांनी अजित दादांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाठवले होते, असे खोत म्हणाले. शरद पवारांनी हा डाव टाकला होता, असेही खोत म्हणाले.