होऊ द्या खळबळ!- सामना

नाना पटोलेंच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता. भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही. नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ! अशा शब्दात सामना संपादकीय मधून भाष्य करण्यात आले आहे.;

Update: 2021-07-14 02:55 GMT

नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत सामना संपादकीय म्हणतात,नाना पटोले हे मोकळय़ाढाकळय़ा स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना. नाना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो. मग लोकांना वाटते आता महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार. तीन पक्षांत वाद, फाटाफूट होणार व सरकार पडणार, पण तसे काहीच घडत नाही व नाना त्यांच्या पुढच्या कामास म्हणजे बोलण्यास लागतात. आता पुन्हा नानांच्या ताज्यातवाण्या वक्तव्याने चहाच्या पेल्यातले वादळ निर्माण झाले असे म्हणतात. लोणावळय़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात नानांनी 'ताव' मारला की, 'आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. मला सुखाने जगू दिले जाणार नाही.' नाना पुढे असेही म्हणाले की, 'काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे'. नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार 'स्वबळा'स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे. नानांवर पाळत ठेवली जात आहे, असे त्यांना वाटते. कालच्या विधिमंडळ अधिवेशनात नानांनी 'पाळत' ठेवण्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला. फडणवीस सरकारच्या काळात अनेकांवर पाळत ठेवण्यात आली. महत्त्वाच्या नेत्यांचे फोन 'टॅप' करण्यात आले. त्यात नानाही होते. आता या प्रकरणाची चौकशी लागली आहे. सरकार एखाद्याचे फोन 'टॅप' करीत असेल म्हणजे एक तर तो देशविघातक कारवायांत सहभागी असायला हवा, नाही तर त्या व्यक्तीपासून सरकारला धोका आहे, असे समजायला हवे. नाना दुसऱया प्रकारात मोडतात. नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंध भक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले. नाना आधी भाजपमध्ये होते. मोदी यांना चार गोष्टी सुनावून त्यांनी पक्षत्याग केला आणि काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतली.

काँग्रेसवर टीका करत सामना संपादकीय मधून महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल. नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे व त्यामुळे ते काँग्रेस पक्षाला जागे करून पुढे नेणार आहेत. या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींना दिली आहे काय? देशातील अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन पडली आहे व त्या प्रत्येक राज्यात नानांना द्रोणागिरी पर्वत उचलून त्यातली संजीवनी गुटिका द्यावीच लागेल. लक्ष्मण मुर्छीत झाला तेव्हा हनुमानाने हेच केले होते, पण येथे नक्की कोण मुर्छीत झाले आहे व हनुमानाच्या भूमिकेत कोण आहे? ते पाहायला हवे. आज नानांचा फोन सध्या कोण चोरून ऐकत आहेत? किंवा नानांवर नक्की कोण पाळत ठेवत आहेत? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. सध्या देशाचे एकंदरीत वातावरण भयभीत व संशयाच्या धुक्यात हरवले आहे. एकमेकांवर पाळत ठेवली जात आहे ही भीती अनेकांना वाटते. त्यात जर दिल्लीश्वरांना अशी खबर लागलीच असेल की, महाराष्ट्रात नाना नामक विभूतीकडे काँग्रेसला संजीवनी देण्याचा मंत्र किंवा गुटिका प्राप्त झाली असून त्यामुळे काँग्रेस स्वबळावर सत्तेवर येऊ शकते, तर त्यांचे कान नक्कीच टवकारले गेले असतील. काँग्रेसच्या नानांना प्राप्त झालेला हा मंत्र किंवा विद्या काय आहे ते ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी नानांवर पाळत ठेवण्याचा प्रयोग केंद्राकडून सुरू आहे असेच दिसते. नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकले जात आहेत तसे ते अनेकांचे ऐकले जात असावेत. महाराष्ट्रातले सरकार दिल्लीश्वरांच्या डोळय़ांत खुपत आहे. मनात सलते आहे. हे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्राने जी महापूजा मांडली आहे.

त्यातला तीर्थप्रसाद म्हणजे नानासारख्यांचे फोन ऐकणे. त्यांच्यावर हेरगिरी करणे. नाना त्यामुळे जास्तच उसळून उठले. नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगडय़ा बोलीचे आहे. अर्थात महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार या असल्या हसण्या, बोलण्याने, बागडण्याने ढिले पडणार नाही. ते काल मजबूत होते, आजही आहे आणि उद्यादेखील मजबूत राहील. नानांवर पाळत ठेवून सरकार पाडले जाईल या अंधभक्तीत कोणी राहू नये. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद तसे काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद होतेच.

काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी नानांनीच त्या मोठय़ा पदाचा त्याग केला हे कसे विसरता येईल? त्यागमूर्तीला त्यामुळेच सत्य वचनाचे तेज प्राप्त होते व नानांना असे तेज प्राप्त झाले आहे. नानांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून काँग्रेसला जमिनीवरून हवेत आणले. काँग्रेस त्यामुळे घोंघावत आहे. नाना बोलतात व काँग्रेस घोंघावते किंवा डोलते. शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे. नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता. भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत, असं शेवटी सामना संपादकीय मधून सांगण्यात आला आहे.

Tags:    

Similar News