औरंगाबाद विमानतळाचं नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' होणार? सुभाष देसाई दिल्लीत दाखल
दिल्लीः आज राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते आज केंद्र सरकारच्या वतीने आयोजित बैठकीत सहभागी होणार आहेत. सोबतच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची ते भेट घेणार आहेत.
या भेटी दरम्यान सुभाष देसाई हे औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करण्याची मागणी सिंधिया यांच्याकडे करणार आहेत. गेल्या काही वर्षापासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली जात आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार मध्ये सत्तेत असलेली शिवसेना या नामाकरण प्रकरणात बॅकफूटवर गेली आहे. त्यातच एमआयएमचे खासदार असुद्दीन औवेसी यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या समाधीच दर्शन घेतल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने यावरून सत्ताधारी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करावं अशी मागणी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे करणार आहेत. त्यामुळं केंद्र सरकार आता या मागणीकडे कसं पाहतं हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसंच केंद्र सरकारने विमानतळाच्या नामांतरावर वेळकाढूपणा केल्यास यावरून भाजप बॅकफूटवर जाऊ शकते. त्यामुळं औरंगाबाद च्या नामांतरावरून बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेला नवीन मुद्दा मिळू शकतो.