राज्यात सत्ताबदल होताच कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला वेग

Update: 2022-08-15 10:26 GMT

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोकणातील महत्वपूर्ण रिफायनरी प्रकल्पाच्या घडामोडींना आता वेग येत आहे. नाणार येथे या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधामुळे या प्रकल्पाची जागा बदलण्यात आली आणि आता कोकणवासीयांचा नकारात्मक सुर बदलला असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीत ध्वजारोहण केल्यानंतर उदय सामंत माध्यमांशी बोलत होते.

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्थानिकांनी आणि विरोधकांनी या प्रकल्पाला मोठा विरोध केला. त्याचंच फलित म्हणुन नाणार चा प्रकल्प राज्याबाहेर नेला जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण हा प्रकल्प धोपेश्वर येथे हलवण्यात आला. यासाठी मागच्या सरकारमधील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत पत्रव्यवहार केला होता. या सगळ्यासंदर्भात उदय सामंत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "नाणारच्या बाबतीत जी भुमिका ग्रामस्थांची होती ती आता धोपेश्वर येथे नाही. निम्म्या लोकांचं समर्थन आहे आणि निम्म्या लोकांचं समर्थन नाही अशी प्राथमिक माहिती मिळतेय. पण तेथील स्थानिक आमदार राजन साळवी हे हा रिफायनरी प्रकल्प त्यांच्या विभागात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लोकप्रतिनिधींचा कल जेव्हा एखादा प्रकल्प झाला पाहिजे याकडे असतो तेव्हा या बाबतीत आम्ही संपुर्ण सकारात्मक विचार करू. जरी ते उध्दव ठाकरेंसोबत असले तरी शिंदे-फडणवीस सरकार या बाबतीत पुर्ण विचार करेल."

मात्र शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्याबाबत बोलताना मंत्री सामंत म्हणाले, "सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार हे या प्रकल्पासाठी सकारात्मक आहेत मात्र खासदार साहेबांची अशी नकारात्मक भुमिका का आहे हे मला असूनही समजलेलं नाही. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केंद्र सरकारला या बाबतीत सांगितलेलं आहे की रिफायनरीसाठी धोपेश्वर ही जागा उपयुक्त आहे तिथे जर प्रकल्प उभा करायचा असेल तर करू शकता. त्यामुळे खासदार साहेबांनी याबाबीत उध्दव ठाकरेंशी चर्चा करून घ्यावी."

नारायण राणेंची मदत घेणार

नारायण राणे हे केंद्राचे लघू आणि सुक्ष्म उद्योग मंत्री आहेत. शिवाय ते कोकणाचे सुपूत्र आहेत. त्यामुळे राज्याचे आणि केंद्राचे उद्योग मंत्री मिळून राज्यात नवनवे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करू. सोबत जे कोकणाच्या पर्यावरणाला पुरक असतील असेच प्रकल्प या परिसरात आणले जातील.

Tags:    

Similar News