राज्यसभा निवडणुकीसाठी चुरस वाढत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार (Sanjay pawar) यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. सेनेने दुसऱ्या उमेदवाराच्या घोषणेमुळे संभाजीराजे छत्रपतींची आशा मावळल्याचे चिन्ह दिसत आहे. संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी संभाजीराजेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, अशी भुमिका घेतली होती. मात्र, संभाजी राजे आपल्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भुमिकेवर ठाम होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १५ राज्यातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या ५७ खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम असे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कॉंग्रेसच्या उमेदवाराची अजूनही प्रतिक्षा आहे.
बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार आणि महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता भाजपचे दोन उमेदवार तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. उर्वरित सहाव्या जागेसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठी चुरस बघायला मिळेल. संजय राऊतांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात कोणतीही शंका नसल्याचं सांगितलं आहे. "शिवसेनेकडून मी स्वत: आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, आमचे सगळे मंत्री, आमदार, एकनाथ सिंदे, संदीपान भुमरे, खासदार, संपूर्ण महाविकास आघाडी यावेळी उपस्थित होते. मी खात्रीनं सांगू शकतो की यावेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेत जातील. आमच्या मनात कोणतीही शंका नाही", असं राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ३१ तारखेला अर्ज भरतील. काँग्रेसचा उमेदवार ठरल्यावर ते भरतील. पण महाविकास आघाडी एकत्र आहे. सहा जागांपैकी आमच्या चार जागा आम्ही निवडून आणू, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केली.
भाजपानं तिसरा, चौथा, पाचवा उमेदवार द्यावा. आम्ही आमच्या जागा निवडून आणू. ईडी, सीबीआय हे दबाव टाकून त्यांच्या जागा जिंकून येणाऱ्या असतील, तर त्यांनी प्रयत्न करत राहावेत. आमची काही अडचण नाही. देशात लोकशाही आहे. आमच्या जागा लढण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही, असं संजय राऊत यांनी अर्ज भरल्यानंतर सांगितलं. सर्व कारवाया फक्त राजकीय सूडबुद्धीनं आणि बदल्याच्या भावनेनं सुरू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला काय चाललंय हे माहिती आहे. हा काळही निघून जाईल आणि एक दिवस ही सूत्र आमच्याकडे असतील", असंही राऊत यावेळी म्हणाले.