राज ठाकरे, राष्ट्रवादी आणि जातीयवाद

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला. असा आरोप राष्ट्रवादीवर केला आहे. मात्र, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपात नक्की किती तथ्य आहे? काय आहे या मागचा इतिहास? जेम्स लेन प्रकरण आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा नक्की काय संबंध आहे? जाणून घ्या विजय चोरमारे यांच्या लेखातून

Update: 2021-08-17 03:18 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाला, असे विधान करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या डोहात टाकलेल्या खड्यामुळे चांगलेच तरंग उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या विधानाचे खंडन करण्यात येत आहे, त्याचा प्रतिवादही करण्यात येत आहे. तो व्यापक प्रमाणात होण्याची आणि या विधानामागील नेमकी वस्तुस्थिती समोर आणण्याची आवश्यकता आहे. नाहीतर अशा अर्धवट विधानांनी तरुणांची मने अधिक गढूळ होण्याचा धोका आहे. वस्तुस्थिती नीटपणे समजून घेऊन कुणी कोणत्याही बाजूला झुकले तरी हरकत नाही, परंतु एकांगी माहिती थोपून तरुणांच्या मनांमध्ये विष कालवण्याचे आणि इतिहासाचे विकृतीकरण करणा-यांच्या उदात्तीकरणाचे उद्योग होऊ नयेत.

राज ठाकरे यांनी हा मुद्दा काढला त्याला बाबासाहेब पुरंदरे यांच्या वयाच्या शंभरीची पार्श्वभूमी असावी. त्यांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवले नसले तरी पुढचे मागचे संदर्भ त्याकडेच निर्देश करतात. राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी केलेला आरोप राजकीय स्वरुपाचा म्हणून एकवेळ दुर्लक्ष करता येईल. परंतु त्यांनी ज्या सहजपणे जेम्स लेन प्रकरण निकालात काढण्याचा प्रयत्न केला ते आश्चर्यजनक आहे.

राज ठाकरे म्हणाले की, 'कोण जेम्स लेन? कुठून आला जेम्स लेन? कसलं पुस्तक लिहिलं त्याने? बरं तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? कुठे आहे तो? काय करतो तो? या सगळ्यातून फक्त हे कोणी लिहिलं तर मग हे ब्राह्मणांनी लिहिलं... मग मराठा समाजातील तरुण-तरुणींपर्यंत पोहोचवलं गेलं. हे सगळं डिझाइन आहे,' वगैरे वगैरे

बाबासाहेब पुरंदरे यांची वकिली करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्यासंदर्भातील बदनामीकारक लेखनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याचा हा डाव आहे. पुरंदरे आणि कंपनीने लिहिलेल्या विकृत लिखाणाचे समर्थन करण्याचे षड्यंत्र म्हणूनही याकडे पाहावे लागेल. जेम्स लेनने जे लिहिले त्याविरुद्ध त्यावेळी आंदोलन झाले नसते, पुण्याच्या लालमहालातला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला नसता तर जेम्स लेनच्या पुस्तकातील ऐकीव माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर संदर्भ म्हणून वापरली गेली असती.

पन्नास, शंभर वर्षांनी पुण्याच्या पेठेतले आजोबा लालमहालातील पुतळा दाखवत आपल्या नातवाच्या कानात कुजबुज करीत राहिले असते आणि आपल्या कुजबुजीला जेम्स लेनच्या पुस्तकातले लेखी पुरावे दाखवत बसले असते. परंतु तसे होऊ शकले नाही. अजित पवार यांच्यासारख्या खमक्या नेत्यामुळे लाल महालातला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा भंगारात निघाल्याने भविष्यातली एक मोठी बदनामीची मोहीम निकालात निघाली आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भाने तपशीलवार विचार करताना काय दिसते?

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली १९९९ साली. सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यानंतर शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना काँग्रेसने निलंबित केल्यानंतर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर लगोलग झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जातीपातीचा मुद्दा कस्पटाएवढाही नव्हता. उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळा प्रचार काँग्रेसच्या विरोधात होता. काँग्रेसने केलेला अन्याय हा राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुद्दा होता. छगन भुजबळ हे ओबीसी नेते प्रदेशाध्यक्ष होते आणि रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने डाव्या पक्षांसह सरकार स्थापन केले. छगन भुजबळ यांच्याकडे सरकारमधले दुस-या क्रमांकाचे पद होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आजवर छगन भुजबळ, बबनराव पाचपुते, अरुण गुजराती, आर. आर. पाटील, भास्कर जाधव, सुनील तटकरे, जयंत पाटील आदींनी काम केले आहे. या सातपैकी तीन प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा होते. शरद पवार यांच्यानंतर पक्षात महत्त्वाचा शब्द असतो तो प्रफुल्ल पटेल यांचा. सध्या राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे चौदा सदस्य आहेत, त्यापैकी सातजण बिगर मराठा आहेत.

विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींना संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न पवार यांनी सातत्याने केला आहे. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हा शरद पवार यांच्या राजकीय सामाजिक वाटचालीचा आधार आहे. त्याच विचारधारेने त्यांच्या पक्षाचीही वाटचाल सुरू आहे. पवार कधी कुठल्या जातीच्या व्यासपीठावर गेले नाहीत. मराठा समाजाची राज्यात एवढी आंदोलने झाली, परंतु त्यापासूनही त्यांनी सुरक्षित अंतर ठेवले होते. हे राज ठाकरे यांना कदाचित ठाऊक नसावे.

राज ठाकरे ज्या जेम्स लेन प्रकरणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताहेत, ते प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर चार वर्षांनी उद्भवलेले आहे. २००३ साली जेम्स लेनच्या लिखाणानंतर महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी विरोध सुरु केला. .

छत्रपती शिवाजी महाराजांच्यासंदर्भातील विषय असल्यामुळे त्यासंदर्भातील प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून येणे अपेक्षित होते आणि घडलेही तसेच. जेम्स लेनला विकृत लिखाणासाठी मदत केल्याच्या रागातून पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत बहुलकर यांना काळे फासले. असे करणे अयोग्यच, परंतु शिवसेना स्टाइलने आंदोलन झाले खरे. त्यावेळी शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांनी तातडीने पुण्याला येऊन बहुलकरांची माफी मागितली. शिवसेनेच्या तत्कालीन शहराध्यक्षांचा राजीनामा घेण्यात आला.

शिवसेनाप्रमुखांवर टीका केली म्हणून छगन भुजबळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारी शिवसेना जिजाऊंच्या बदनामीनंतर मात्र, वेगळे वागताना दिसत होती. राज ठाकरे यांनी बहुलकरांची माफी मागण्यापुरते ते मर्यादित नव्हते, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी `विचारांचा सामना विचारांनी करायला पाहिजे`, असा सूर लावला होता. तो वाजपेयी यांच्या प्रकृतीला साजेसा होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या बदनामीनंतरही वाजपेयींची `विचारांचा सामना विचारांनी करण्याची` भूमिका शिवसेनेने स्वीकारली हे आश्चर्यकारक होते.

याच घटनेनंतर शिवसेनेचे छत्रपती शिवाजी महाराजांप्रती प्रेम बेगडी आणि राजकीय स्वार्थासाठी असल्याची टीका होऊ लागली. शिवसेना थंड बसल्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेड ही संघटना जिजाऊंच्या सन्मानासाठी पुढे आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय अपहरण झाले होते, त्यापासून त्यांना मुक्त करण्याची ही सुरुवात होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर जिजाऊंचे चारित्र्यहनन झाल्यानंतरही थंड पडलेल्या महाराष्ट्राला संभाजी ब्रिगेडने जागे केले. .

जेम्स लेनच्या बदनामीकारक लिखाणाचे प्रेरणास्थान असलेल्या पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करून त्यांनी हा विषय ऐरणीवर आणला. अर्थात असा हल्ला कोणत्याही पातळीवर समर्थनीय ठरू शकत नाही. संभाजी ब्रिगेडच्या या कृत्याचे समर्थन करता येत नाही. परंतु या हल्ल्यामुळेच जिजाऊंच्या बदनामीचे गांभीर्य महाराष्ट्राच्या लक्षात आले, हे लक्षात घ्यावे लागते. त्यानंतर जेम्स लेनने अधिकृतपणे पुस्तक मागे घेण्यापर्यंत प्रकरण गेले.

पाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांनी हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला आणि ७१ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्र विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष बनला. याच संदर्भाने राज ठाकरे राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करीत असावेत.

उरतो मुद्दा जातीयवादाचा. उत्तर प्रदेशात कांशीराम-मुलायम सिंह यादव यांनी १९९३ मध्ये बसप-सप युती करून दलित, मुस्लिम, ओबीसी मतदारांचे एकत्रिकरण करून सत्ता मिळवली होती.

देशाच्या राजकारणात अन्यत्रही तो फॉर्म्यूला हळुहळू आकार घेऊ लागला. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली माळी-धनगर-वंजारी (माधव)या जातींचे संघटन भाजपने केले. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा `माधव` फॉर्म्यूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या खूप आधीचा आहे, हे राज ठाकरे यांना कदाचित माहीत नसावे. एकूणच महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे, जातीव्यवस्थेचे त्यांचे आकलन थिटे आहे.

आरक्षणाच्या प्रश्नाची गुंतागुंत समजून न घेता आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी ते करतात तेव्हा गंभीर आणि गुंतागुंतीच्या प्रश्नाचे सुलभीकरण करीत असतात. शहरी मानसिकतेला आणि शहरी मानसिकतेतल्या प्रसारमाध्यमांना ते क्रांतिकारी वाटत असते, हा दोष काही राज ठाकरे यांचा नव्हे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रिडल्स प्रकरण आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनासंदर्भातही राज ठाकरे यांच्या भूमिकेची उजळणी एकदा व्हायला हवी. भविष्यात भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाण्यासाठीची तयारी आणि भाजपचे विखारी हिंदुत्ववादी राजकारण स्वीकारण्याच्या टप्प्यावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीयवादावर बोलावे यासारखा विनोद दुसरा कुठला असू शकत नाही.

(विजय चोरमारे यांच्या फेसबूक वॉलवरून साभार)

Tags:    

Similar News