गेल्या काही दिवसात वसंत मोरे चर्चेत आहेत. त्यातच वसंत मोरे यांनी आपल्याला डावलले जात असल्याची भावना व्यक्त करत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
मनसे नेते वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्यातच राज ठाकरे यांच्या भुमिकेशी विसंगत भुमिका घेतल्याने वसंत मोरे यांना मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून पायऊतार व्हावं लागले. वसंत मोरे यांच्याकडील शहराध्यक्षपद गेल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाकेबाजी केली. त्यामुळे वसंत मोरे नाराज होते. त्यातच वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर येऊन मला पक्षात डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली होती. तर यापुढे मी पुणे मनसेच्या कार्यालयाची पायरी चढणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे वसंत मोरे नाराज असल्याचे उघड झाले होते.
वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यातच राज ठाकरे या दौऱ्यात वसंत मोरे यांच्या नाराजी नाट्याचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे म्हटले जात आहे.
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात काय आहे?
राज ठाकरे यांनी 5 जुन रोजी आयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यातच महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पक्षातील महत्वाच्या नेत्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत. तसेच वसंत मोरे यांच्यासह नाराज पदाधिकाऱ्यांसोबतही बैठक घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात वसंत मोरे यांच्या नाराजी नाट्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यात परवानगी मिळणार का?
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असले तरी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मागण्यात आली आहे. मात्र या सभेसंदर्भात पोलिसांनी कुठलीही माहिती कळवली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसंत मोरे यांची नाराजी का?
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची घोषणा स्थानिक पातळीवर अडचणीची ठरणार आहे, असे सांगत राज ठाकरे यांच्या मताशी विसंगत भुमिका घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे यांचे पुणे शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले. तर त्यावेळी पुणे शहरात मनसे पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवले. तसेच त्यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेत हे प्रकरण मिटल्याचे सांगितले. मात्र राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना वसंत मोरे त्याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर मनसे कार्यकर्ते भोंगे उतरवण्याबाबत आंदोलन करत असताना वसंत मोरे हे बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते.
वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या महाआरतीला राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यावेळी राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर मला पक्षात डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा वसंत मोरे यांची नाराजी उसळून आल्याने राज ठाकरे पुणे दौऱ्यात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.