राज ठाकरे माफी मागा, ब्रिजभुषण सिंह यांच्यापाठोपाठ भाजप खासदाराची मागणी
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. तर त्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. मात्र त्यानंतरही राज ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता राज ठाकरे माफी मागा अशी भाजप खासदार साक्षी महाराज यांनी मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर हा दौरा वादात सापडला होता. तर भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला. तर या दौऱ्याला महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मनसेने शरद पवार यांचे ब्रिजभुषण सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर करत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. तर त्यानंतर आता ब्रिजभुषण सिंह यांच्यापाठोपाठ भाजप खासदार साक्षी महाराज यांनीही राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातील अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
उन्नावचे खासदार साक्षी महाराज म्हणाले, विरोध करणारे विरोध करत आहेत, स्वागत करणारे स्वागत करत आहेत. मात्र अटकपासून ते कटकपर्यंत संपुर्ण भारत एक आहे. या देशातील हिंदू मुस्लिम, गरीब, श्रीमंत सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत जी भुमिका घेतली होती. ती चुकीची होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे म्हटले आहे.
अयोध्यावासीयांची एवढीच अपेक्षा आहे की, राज ठाकरे यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. कारण बिभीषणानेही देवाची माफी मागितली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनीही उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे मत साक्षी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
राज ठाकरे यांच्याविरोधात सापळा रचला जात असल्याचे राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत म्हटले होते. तर मंगळवारी मनसेने फोटो ट्वीट करून थेट शरद पवार यांनीच सापळा रचला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला होता. मात्र आता भाजपच्या दुसऱ्या खासदारानेही राज ठाकरे यांनी माफी मागा, अशी मागणी केल्याने मनसे काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.