#PunjabPolitics : कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Update: 2021-09-18 12:49 GMT

अखेर पक्षांतर्गत वादांमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दुपारी चार वाजता आपला राजीनामा राज्यपालांना सादर केला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दीर्घकाळ पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केले. पण गेल्या काही दिवसात पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत सुरू असलेल्या संघर्षानंतर अखेर पक्षश्रेष्ठींनी अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले, त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.



 

राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली. त्यांनी काँग्रेस हायकमांडबद्दलही आपली नाराजी दाखवून दिली. आपण शनिवारी सकाळीच काँग्रेस अध्यक्षांशी संवाद साधला, तसेच आपण राजीनामा देणार असल्याचेही सांगितले होते. दोन महिन्यात आमदारांना तीनवेळा दिल्लीत बोलवून घेण्यात आले. आपण सरकार चालवू शकत नाही असा संशय आपल्यावर हायकमांडला आहे, का असा प्रश्न पडला होता, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. एवढंच नाही तर आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटत असल्याच्याही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आता पक्षाने त्यांना हव्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवावे असेही त्यांनी म्हटले आहे.



 


राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. स्वत: अमरिंदर सिंग यांनीही आपल्या पुढील वाटचालीचे गूढ कायम ठेवले आहे. आपल्य़ाकडे भविष्यातील वाटचालीसाठी नेहमीच पर्याय असतील, पण त्याबाबत आपण भविष्यात निर्णय घेऊ, सहकाऱ्यांशी चर्चा करु असे त्यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News