सुखजिंदर सिंह रंधावा पंजाबचे पुढील मुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने पुढील मुख्यमंत्री म्हणून सुखजिंदर सिंह रंधावा यांचे नाव पुढे केले आहेत. आता यावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचेही नाव या अगोदर चर्चेत होते. परंतु त्यांच्या नावाला विरोध झाल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांड जाखड यांच्या बाजूने असल्याचं देखील वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी जाखड यांच्या नावाला विरोध केला. मात्र, राज्यसभा खासदार प्रताप सिंह बाजवा यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी त्यांचं फारसं जमत नाही. त्यामुळं सिद्धूसुद्धा त्यांच्या बाजूने नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी सुनील जाखार, प्रतापसिंह बाजवा, माजी मुख्यमंत्री बेअंतसिंह यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू, काँग्रेसच्या राज्यसभा खासदार अंबिका सोनी, राज्य मंत्री सुखजिंदर रंधवा आणि नवज्योतसिंग सिद्धू यांची नाव चर्चेत होती. मात्र, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री पद नाकारलं.
या संदर्भात बोलताना पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष पवन गोयल म्हणतात यांनी सांगितलं "हरीश रावत आणि अजय माकन यांच्यासोबत काल (18 सप्टेंबर) आमदारांची बैठक झाली. त्यानंतर आता सोनिया गांधी जो निर्णय घेतली तो अंतिम असेल असा ठराव संमत करण्यात आला आहे. आणि त्यांचा निर्णय तुम्हाला आज कळेल."
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत घेतलेल्या बैठकीमध्ये, पंजाबमधील नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा केली. तसेच, रात्री उशिरा एका बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि अंबिका सोनी यांना राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पाहिलं गेलं. मात्र, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही नावं नवीन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान, शनिवारी पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला 78 आमदार उपस्थित होते, त्यापैकी बरेच कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे समर्थक होते. मात्र, फक्त कॅप्टन अमरिंदर आणि एक अन्य आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. पंजाबमध्ये काँग्रेसचे एकूण 80 आमदार आहेत.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत, सोनिया गांधी यांना मुख्यमंत्रिपदी हव्या त्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे एकमताने अधिकृत करण्यात आले असले तरी आता प्रश्न असा आहे की, पंजाबची खुर्ची कोणाला मिळणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.