पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत अजित पवार यांचे कट्टर विरोधक प्रदीप कंद विजयी

Update: 2022-01-04 10:57 GMT

पुणे  :  राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आघाडी घेतली असली, तरी एका जागेवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, या जागेवर सुरेश घुलेंचा 14 मतांनी पराभव झाला.

पुणे जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 21 पैकी 21 जागा मिळवल्या होत्या. अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेवर आतापर्यंत सात वेळा अध्यक्षपद भूषवलं आहे. या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्यात. उरलेल्या सात जागांसाठी रविवार, दोन जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यापैकी एका जागेवर अजित पवार यांचे कट्टर विरोधक प्रदीप कंद निवडून आलेत. या निकालानंतर अजित पवार यांना हा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झालेत. भाजपचे आबासाहेब गव्हाणे यांचा त्यांनी पराभव केला आहे. मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे यांचा विजय झालाय. सुनील चांदोरे यांना 28 मते मिळाली, तर कलाटे यांना 17 मते मिळाली.

दरम्यान प्रदीप कंद यांचा विजय झाल्यानंतर नेमकी कुठे गडबड झाली याची मी माहिती घेतो असं अजित पवार यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News