पुणे शहराचं विभाजन व्हावं, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुणे महापालिका निवडणूका तोंडावर असतानाच भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.;
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष आहे. यामध्ये 14 महापालिका आणि 25 जिल्हापरिषदांच्या निवडणूका पार होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहराचं विभाजन व्हावं, असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पुणे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेतली तर पुणे शहराचे विभाजन होणे आवश्यक आहे. कारण गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश झाला. त्यामुळे शहराची हद्दवाढ झाली आहे. तर पुणे महापालिका ही देशातील सर्वात मोठी महापालिका बनली आहे. त्यामुळे पुणे शहराची लोकसंख्या आणि विस्तार विचारात घेता पुणे महापालिकेचे विभाजन होण्याची आवश्यकता आहे, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यंनी केले.
पुण्यात आधीच पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड या महापालिका आहेत. त्यानंतर पुण्याजवळीत 34 गावांचा टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समावेश करून महापालिकेची हद्दवाढ करण्यात आली. नागरिकांना सुविधा देण्यावर मर्यादा पडत आहेत. त्यामुळे नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून पुणे महापालिकेचे विभाजन करायला हवं, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, माझं मत हे राजकीय नाही. पण महापालिकेचा विस्तार वाढल्याने समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कामकाजात सुलभता यावी, यासाठी हा निर्णय आवश्यक आहे, असही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादीला रोखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीने पुणे शहरातील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. तर अजित पवार पुणे शहराचे पालकमंत्री असताना त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला आहे. मात्र तरीही पुणे शहरातील अनेक समस्या कायम आहेत. त्यातच पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश करण्यात आल्याने संसाधनांवर त्याचा भार पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी शहरातील महापालिकेचं विभाजन करण्याबाबत वक्तव्य केल्याने हा भाजपचा निवडणूक जिंकण्याचा प्लॅन असल्याची चर्चा रंगली आहे.