प्रशांत किशोर यांची रणनीति फेल? गोव्यात तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या 5 नेत्यांचा राजीनामा
ममता बॅनर्जी यांनी 2024 ला पंतप्रधान होण्यासाठी आत्तापासूनच त्यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा विस्तार पश्चिम बंगालच्या बाहेर करायला सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी रणनीतिकार प्रशार किशोर रणनीति तयार करतात. मात्र, प्रशांत किशोर यांची आगामी 5 राज्याच्या निवडणूका लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांच्यासाठी तयार केलेली रणनीति फेल ठरताना दिसत आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांना गोव्यात गळाला लावायला आहे. गोव्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेससह राष्ट्रवादीला झटका देत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला होता. मात्र, यातील 5 सदस्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं प्रशांत किशोर यांच्या रणनीतिला हा मोठा झटका मानला जात आहे.
शुक्रवारी म्हणजे 24 डिसेंबरला एका माजी आमदाराने टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर तीन महिन्यांतच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला राम राम ठोकला आहे. त्यातच आता ममता बॅनर्जी यांची साथ सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
काँग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फालेरो यांच्यासह तृणमूलमध्ये सामील झालेल्या नेत्यांनी तृणमूल कॉंग्रेसला राम राम ठोकला आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वतः या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर फालेरो यांना टीएमसीने राज्यसभेवर घेतले होते. माजी आमदार लवू मामलेदार यांनी शुक्रवारी आपला राजीनामा ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठवला. सुरुवातीला टीएमसीमध्ये सामील झालेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. आपल्या राजीनाम्यात त्यांनी टीएमसी भाजपपेक्षा वाईट असल्याचे म्हटले आहे.
ममता बॅनर्जी गोव्यातील जनतेला समजू शकल्या नसून त्या जातीयवादी रणनीती वापरत असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. लवू मामलेदार यांच्यासह राम किशोर परवार, कोमल परवार, सुजय मलिक, मांद्रेकर या नेत्यांनीही टीएमसीला राम राम ठोकला आहे.
"गोवा आणि गोवावासीयांना चांगले दिवस येतील या आशेने आम्ही टीएमसीमध्ये सामील झालो होतो. पण तृणमूलने गोवा आणि गोव्यातील जनतेला समजून घेतले नाही आणि जातीयवादाचे राजकारण करायला सुरुवात केली हे दुर्दैव आहे.'' असा आरोप या नेत्यांनी केला आहे.
एकंदरित तृणमूल कॉंग्रेस गोवा विधानसभा निवडणूकीत एक प्रबळ पक्ष म्हणून उतरण्याच्या तयारीत असताना तृणमूल कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. गोव्यात प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी तयार केलेल्या रणनीतिला यामुळे मोठा धक्का बसला आहे.