राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे. राहुल गांधी दररोज पायी चालत आहेत त्यांचे कौतूकच. पण ते भारत देशात नेमकं काय जोडायला निघालेले आहेत ते कळायला मार्ग नाही. त्यामुळे भारत जोडो यात्रेऐवजी जाती अंताचा कार्यक्रम राबवण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
जोपर्यंत देशात जाती आहेत. तोपर्यंत देश जोडला जाणार नाही, हे राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी लक्षात ठेवावं. तसेच राहुल गांधीची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही निव्वळ पाण्याचा बुडबुडा आहे. जोवर सोबत मार्च आहे तोपर्यंत ठीक. त्यानंतर लोकांना सुब्रह्मण्यम स्वामी (subramanyam swami) दिसायला लागेल, असं मत प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ३७० हे कलम रद्द केल्यानंतर मलेशियाच्या प्रधानमंत्र्यांनी असं विधान केलं होतं की, भारताची ही वृत्ती चांगली नाही. त्यानंतर मोदींनी (Narendra modi) तात्काळ मलेशियातून आयात होणारे पामतेल आयात करणे थांबवले. यातून ४५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या नियमानुसार एखादा करार मध्येच तोडता येत नाही. पण मोदींनी तो तोडला आणि देशाचं नुकसान करवून घेतलं याचा जाब राहुल गांधी हे मोदींना विचारतील काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
या देशात बाँब संस्कृती कुणी आणली?
आरएसएस आणि मोहन भागवत (Mohan Bhagvat) हे वैदिक हिंदू धर्माचे प्रचारक आहेत. ते हिंदू धर्माचे संत नाहीत. मनुस्मृती हे वैदिक हिंदूंचा भाग आहे. या देशात बॉम्बहल्ल्याची संस्कृती कुणी आणली? का आणली? हे सगळ्यांना माहिती आहे, अशी टीका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
अशोक चव्हाण, अमित देशमुख टीकेच्या केंद्रस्थानी (prakash Ambedkar criticize to amit deshmukh and Ashok chavan)
प्रकाश आंबेडकर म्हणाले, विधानसभेचे १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यावेळी नांदेडकर आणि लातूरकर हे देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांच्या मांडीवर बसायला तयार झालेस असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्यावर केली.
इथला शेतकरी शेतीपेक्षा जातीय सत्तेला महत्व देतो .त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ येते. केंद्राचे कापूस आयातीचे धोरण चुकीचे आहे. जर सरकारने कापूस आयात करणे थांबवले तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. पण सरकार ते करीत नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली. तसेच जर शेतकऱ्याने शेतीला महत्व दिलं असतं तर अशोक चव्हाण निवडून आले नसते, असं मत त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याबाबतीत बोलताना व्यक्त केलं आहे.