देवेंद्र फडणवीस यांचा बळी का?, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

दहा दिवसांच्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांचा गेम झाल्याची चर्चा रंगली आहे.

Update: 2022-07-01 07:32 GMT


एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात केलेल्या बंडानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर डिमोशन झाल्याने भाजप नेतृत्वाने फडणवीस यांचा गेम केल्याची चर्चा आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून प्रतिक्रीया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा भाजपने शकरराव चव्हाण केल्याची प्रतिक्रीया दिली आहे.

त्यानंतर आज पुन्हा ट्वीट करून प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले. मात्र त्यानंतर पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी आधी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास नकार दर्शवला. मात्र अमित शाह यांनी सांगितल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतू उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना फडणवीस यांचा स्वर कातर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे फडणवीस हे डिमोशन झाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच त्यांचा पक्षनेतृत्वाने गेम केल्याचीही चर्चा आहे. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी सवाल केला आहे.

Tags:    

Similar News