रायगडमध्ये शिवसेना आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सडेतोड उत्तर

Update: 2022-02-13 09:31 GMT

रायगड :  राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असले तरी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच कुरघोडी सुरू आहे. तर रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदार गोगावले यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधत पालकमंत्री बदलाची मागणी केली होती. त्याला राष्ट्रवादीने पोस्टर लावून जोरदार प्रत्युत्तर दिले.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्ष पहायला मिळत आहे. त्यातच शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली. त्याला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूकीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत आघाडी केल्याने राजकीय वातावरण गढूळ झाले. तर त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. त्यापार्श्वभुमीवर आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी पालकमंत्री हटाव मोहिम उघडली. त्याला राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देत सोशल मीडियावर बॅनरबाजी केली आहे. त्यावरून रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे.


 



राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री आदिती तटकरे यांचे जोरदार समर्थन करत ' अद्वितीय आदितीताई ' या टॅगलाईनने सपोर्ट पालकमंत्री अशा आशयाची पोस्टर्स सोशल मीडियावर झळकवली . त्याला शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे . दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगर पंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या मनमानी करतात, असा आरोप शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील तीन शिवसेना आमदारांच्या वतीने केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली. तर यावरून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रीया देणे टाळले होते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला खिजवायला सुरूवात केली.

आदिती तटकरे यांचे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ' पुष्पा ' चित्रपटातील प्रसिद्ध असलेला डायलॉग वापरून तयार केलेली पोस्ट जास्त चर्चेत आली आहे . ' लडकी समजके फ्लॉवर समझे क्या , फायर है हम ' या पोस्टमुळे शिवसैनिक अधिकच आक्रमक बनले आहेत . राष्ट्रवादीच्या पोस्टबाजीला प्रत्युत्तर देताना ' काल पण ... आज पण आणि उद्या पण शिवसेनाच ' या टॅग लाईनने पोस्ट तयार करून सोशल माध्यमातून व्हायरल केले जात आहे . महाविकास आघाडी सरकारमध्ये रायगडमधील शिवसैनिकांनी फक्त राष्ट्रवादीची भांडी घासायची काय ? असा सवाल शिवसैनिक सोशल मीडियावर विचारत आहेत .


 



पालकमंत्री नव्हे महाडचा आमदार बदलण्याची वेळ आली आहे , अशा पोस्ट राष्ट्रवादीकडून व्हायरल होत आहेत . एकूणच पालकमंत्री बदलण्याच्या मागणीवरून रायगडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीत सध्या तरी सोशल मीडिया युद्ध जुंपल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी ही परिस्थिती अशीच राहिली तर हा वाद रस्त्यावर यायला उशीर लागणार नाही , अशी शक्यता वर्तवली जात आहे .

Tags:    

Similar News

Kamla ahead of Trump?