महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

महाराष्ट्रात पर्यायी राजकारण देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला नवा चेहरा मिळाला आहे.

Update: 2023-05-04 04:05 GMT

मुंबई – पर्यायी राजकारण देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला आता नवा चेहरा मिळणार आहे. परदेशात शिक्षण घेऊन परत आलेल्या सुजात आंबेडकर यांनी पुन्हा सक्रीय होत बहुजन कार्यकर्त्यांवर असलेल्या राजकीय गुन्ह्यांचा प्रश्न हातात घेऊन सर्वपक्षीय युवकांना साद घातली आहे. सुजात आंबेडकर यांनी ‘सतरंजी उचल्या’ अशी भूमिका असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांवर असलेल्या केसेस चा मुद्दा हातात घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे.

राजकीय आंदोलनं असोत, सण असोत किंवा रस्स्त्यावरचा संघर्ष, सामान्य कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असतात. नवरात्र मंडळ, गणपती मंडळ, दहीहंडी मंडळ असो नाही तर मोर्चे आंदोलनं, गुन्हे दाखल होणाऱ्यांमध्ये बहुजन युवक युवतींचा भरणा जास्त असतो. राजकीय पक्ष ही अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. कोर्टकचेऱ्या आणि पोलिस स्टेशनच्या वाऱ्या यामध्ये या तरूण कार्यकर्त्यांचे करिअर पणाला लागते. या तरूण कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना तोंड फोडण्यासाठी आणि त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत म्हणून सुजात आंबेडकर यांनी जोरदार काम सुरू केले आहे. विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी भेटून सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. त्यानुसार वंचित आघाडीच्या मार्फत याविरोधात मोठं राज्यव्यापी आंदोलन उभं केलं जाणार आहे.

वंचित ने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा पर्याय निर्माण करण्यासाठी आपली बांधणी सुरू केली आहे. अशा वेळी बहुजन कार्यकर्त्यांचा प्रश्न घेऊन सुजात आंबेडकर यांनी सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर नवा अजेंडा सेट केला आहे. राजकीय गुन्ह्यांमुळे नाराज असलेले सर्वपक्षीय लढाऊ कार्यकर्ते यामुळे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित च्या आसऱ्याला येऊ शकतात. 

Tags:    

Similar News