पंतप्रधान मोदींचा भाजपला १ हजार रुपये पक्षनिधी

Update: 2021-12-25 10:41 GMT

भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून पक्षाला मिळणाऱ्या देणग्या वाढल्या आहेत, पण विरोधकांच्या देणग्या मात्र कमी होत आहेत, अशी टीका होते आहे. तर दुसरीकडे उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी केली असताना आता पक्षाने निधी उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपने पक्षनिधी उभारणीसाठी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत पक्षनिधी देण्यासाठी आता आवाहन केले जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आपण १ हजार रुपये पक्षनिधी दिल्याचे सांगितले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पक्षनिधी दिल्याची पावती देखील दिली आहे. "मी १ हजार रुपये पक्षनिधी म्हणून देणगी दिली आहे. आधी देश कर्तव्य हा आदर्श आणि निस्वार्थ सेवा कऱणाऱ्या कार्यकर्त्यांची संस्कृती सक्षम कऱण्यासाठी तुमची छोटी देणगी उपयुक्त ठरेल", असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


ही विशेष मोहीम २५ डिसेंबर ते ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील एक हजार रुपये देणगी दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी देणगी देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पाच रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत देणगी देता येणार असल्याचे भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितले आहे.



Tags:    

Similar News