पेट्रोल डिझेलवरच्या करकपातीवरून अजित पवार भडकले

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर या शिंदे फडणवीस सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यातच शिंदे फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरच्या करात कपात केली. त्यावरू राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले.;

Update: 2022-07-15 04:40 GMT

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गुरुवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकावर टीका केली आहे.

अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेलच्या करकपातीवर टीका करताना म्हटले आहे की, राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. मात्र ही करकपात अत्यंत तटपुंजी आहे. कारण सरकार बदलल्यानंतर आम्ही काहीतरी नवं करतोय, असं दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारने केला आहे.

जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या करात 50 टक्के कपात करण्याची मागणी भाजपकडून केली जात होती. मग आता भाजपचेच सरकार आहे ना. तर मग आता का केला नाही 50 टक्के कर कमी? असा सवाल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, इंधनावरील कर 50 टक्के कमी केला तर डिझेल 11 आणि पेट्रोल 17 ते 18 रुपयांनी कमी झाले असते. मात्र सरकारने त्यांनी आधी म्हटल्याप्रमाणे कर कमी केला नाही.

विरोधी पक्षात असताना मागणी करायची आणि सरकार आलं की पळवाट काढायची, असं शिंदे फडणवीस सरकारचं काम आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला. तर एकीकडे इंधनाच्या दरात 3 ते 5 रूपये कपात करायची आणि दुसरीकडे केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढवायचे, गॅसच्या दरात वाढ करायची, असं सगळं सुरू आहे, असंही अजित पवार म्हणाले. याबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या करकपातीने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात काहीही फरक पडणार नसल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News