#PegasusSnoopgate : संसदेचे कामकाज रोखून धरण्यासाठी हेरगिरीचा आरोप, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Update: 2021-07-20 12:25 GMT

पिगॅसिस हेरगिरी प्रकरणावरुन संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने दुसऱ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही. या प्रकरणी संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर यामागे मोदी सरकारचा हात असल्याचा आरोपही केला जात आहे. यासर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आरोप फेटाळले आहेत आणि हा सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आऱोप केला आहे. याच मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पिगॅसिस संदर्भातील सर्व आऱोप फडणवीस यांनी फेटाळले तसेच अशा काल्पनिक बातम्या पेरुन संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.

सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू झाले असले तरी ते व्यवस्थित चालू द्यायचे नाही, असा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. एवढेच नाही तर पिगॅसिस प्रकरण हे अधिवेशन चालू नये यासाठी जाणुनबुजून पेरले गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ज्या माध्यमांनी याबद्दलचे वृत्त दिले त्या वृत्ताला आधारच नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या वृत्तानुसार 40 च्या वर देशांचा उल्लेख आहे. पण फक्त भारताची चर्चा का केली जात आहे असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. भारत जेव्हा जेव्हा प्रगती करतो तेव्हा तेव्हा काही जण आपल्या हितासाठी भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातही अनेकदा फोन टॅपिंगचे आरोप झाले, पण त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वत: लोकसभेत राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न, आयकर चोरी किंवा आर्थिक घोटाळा अशा स्वरुपाच्या बाबींसाठी फोन टॅपिंग केले जाते, पण त्याची माहिती बाहेर जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले होते. त्यामुळे केंद्र सरकारची कोणतीही एजन्सी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करत नाही. देशातील टेलिग्राफ कायद्यांर्तग योग्य ती खबरदारी घेऊन माहिती मिळवता येत असते. म्हणूनच 'पेगॅसिस'वरून होणारे आरोप हा एक कट आहे, असा आऱोप फडणवीस यांनी केला आहे.

Tags:    

Similar News