Pegasus Spy case: संसदेबाहेर विरोधकाचं आंदोलन, कॉंग्रेस, डीएमके, शिवसेना आंदोलनात सहभागी

Update: 2021-07-23 07:09 GMT

गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे पेगॅसस! या पेगॅसस प्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारला चांगलंच घेरलं आहे. पेगॅसस प्रकरणी राज्यसभेत 22 जुलैला मोठा गोंधळ झाल्यानंतर आता विरोधक संसद परिसरात पेगॅसस प्रकरणी सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात डीएमके, काँग्रेस आणि शिवसेनेचे खासदार सहभागी झाले होते.

गेल्या 19 जुलै पासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनापुर्वी भारतातील द वायर आणि जगभरातील काही निवडक वृत्तसंस्थानी केलेल्या शोधपत्रकारीतेत पेगॅसस स्पायवेअर प्रकरणाचा खुलासा झाला आणि भारतीय राजकारणात एक मोठा भूकंप झाला.

या वृत्तसंस्थांच्या रिपोर्ट नुसार पेगॅसस स्पायवेअरचा वापर करून भारतातील काही राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, न्यायालयीन अधिकारी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. या प्रकरणात राहुल गांधी, भाजपचे विद्यमान माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर पळत ठेवली गेल्याचे जाहीर झाले. आणि यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घालायला सुरवात केली.

गेल्या चार दिवसात याच कारणास्तव अनेकदा संसदेच्या दोन्ही सभागृह बऱ्याच वेळा तहकूब करण्यात आली. कालही दुपारपासून दिवसभर राज्यसभा विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे तहकूब करण्यात आली होती. पेगॅसस प्रकरणी विरोधक इतके आक्रमक झाले आहेत की, त्यांनी आजपासुन संसद परिसरात मोदी सरकार विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामध्ये डीएमके, कॉंग्रेस तसेच शिवसेनेचे खासदार सहभागी झाले आहेत.

Tags:    

Similar News