लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब
विरोधकांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. आज तिसऱ्यांदा सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले.
विरोधकांच्या सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज उद्या (मंगळवार,२७ जुलै) पर्यंत तहकूब करण्यात आलं. सोमवारी तिसऱ्यांदा सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले. यापूर्वी दुपारी २ वाजेपर्यंत आणि पुन्हा दुपारी ३ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी लोकसभा पुन्हा सुरू झाली. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर लगेचच पेगासस प्रकल्प अहवालाच्या तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. दरम्यान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट विधेयक, २०२० लोकसभेत मंजूर झाले.
दोन्ही सभा सदस्यांनी कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल वेटलिफ्टर मीराबाई चानूचे सर्वांनी अभिनंदन केले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधकांनी एकच गदारोळ केला. दरम्यान राज्यसभा देखील संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.