पंकजा मुंडे समर्थकांचे राजीनामासत्र, मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याचे पडसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आता चार दिवस उलटले आहेत. पण मंत्रिमंडळात विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने आता राज्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपमध्ये मुंडे परिवाराला डावलले जात असल्याचा आरोप पंकजा मुंडे समर्थक करु लागले आहेत. यामुळे शनिवारी मुंडे समर्थक 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना न घेतल्यामुळे पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सुनिता दौंड यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच अनेक गावांचे सरपंच आणि उपसरपंच पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांच्या समर्थनार्थ राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात मुंडे परिवाराला डावललं जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं नाराज झालेल्या मुंडे समर्थकांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. बीड भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, शनिवारी जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात तब्बल चौदा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखन किती राजीनामे येणार? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार? यासह या राजीनामा सत्रामुळे पंकजा मुंडे यांच्या मनात नक्की काय सुरु आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.