मुंडे बहिण-भावाचं पॅचअप, पंकजा मुंडे यांच्या एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडे बिनविरोध
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबतचे वैर संपल्याचे जाहीर केल्यानंतर तीन दिवसातच मोठी घडामोड भावाच्या मदतीला बहिण धावली असल्याचे समोर आले आहे.
Beed News : संत भगवान बाबा गड (Bhagvan Baba gad) येथे झालेल्या कार्यक्रमात माझे धनंजय सोबतचे वैर संपल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे आणि धुनंजय मुंडे यांच्या दिलजमाईचे वृत्त आले होते. मात्र आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर (Jawahar Education Society) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची सभासद म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यातील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या 34 सभासगांसाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र यामध्ये त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भगवानगडावरील बहिण भावाच्या मनोमिलनानंतर पहिल्याच निवडणूकीत पंकजा मुंडे यांच्या संस्थेवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंकजा मुंडे यांच्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र इतर जागांवरही तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. तसेच या निवडणूकीत पंकजा मुंडे यांच्या हितचिंतकांकडून विरोधात एकही अर्ज आला नाही. परंतू इतर 33 जागांवर निवडणूक होण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे यांनी भगवान गड येथे बोलताना बहिण भावातील वाद संपल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता थेट पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात उमेदवार न देता धनंजय मुंडे यांना बिनविरोध निवडून आणल्याने बहिण भाऊ एकत्र येण्याचे संकेत मानले जात आहेत.