महाराष्ट्र नंतर आता 'या' राज्यात भाजपाचा 'शिंदे' पँटर्न?
महाराष्ट्रातील शिंदे पॅटर्नची चर्चा देशात रंगली आहे. त्यातच भाजप आणखी एका राज्यात शिंदे पॅटर्न राबवण्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.;
महाराष्ट्रात शिंदे सरकार ( Eknath shinde) स्थापन करण्यासाठी कोणती 'महाशक्ती' होती हे आता उघड झाले आहे. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून विरोधी सरकार उलथवण्यासाठी 'एकनाथ शिंदेंप्रमाणेच आमदार फोडा आणि मुख्यमंत्री बना'; अशी ऑफर देऊन छत्तीसगड राज्यात सरकार पाडण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांनी ऑफर दिल्याचा दावा छत्तीसगडचे कोळसा व्यापारी सूर्यकांत तिवारी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पार्टीने ( bjp)आतापर्यंत मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या ऑपरेशन लोटस पूर्ण केले आहे. राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये अद्यापही ऑपरेशन कमळला यश आले नाही.
गोव्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता असूनही काँग्रेस ( Congress) कमकुवत करण्यासाठी काही आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेला ( shivsena) सुरुंग लावत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आता महाराष्ट्रातील ऑपरेशन कमळ (operation lotus)यशस्वी झाल्यानंतर छत्तीसगड राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
त्यानुसारच आता छत्तीसगडमध्ये केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांनी वेग पकडला आहे.
आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर सूर्यकांत तिवारी यांनीच हे खळबळजनक आरोप केले आहेत. छत्तीसगड राज्यामध्ये सत्तांतर घडवून आणण्याचा कट रचला जात असून छापेमारीच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सूर्यकांत यांनी केला आहे. ३० जून रोजी आपल्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली असं सूर्यकांत सांगतात. यावेळेस काही अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकून राज्यातील ४० ते ४५ आमदारांची यादी तयार करावी असं सांगितलं. काही अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यात सत्तापालट घडवून आणावा. असं केल्यास तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल, अशी ऑफर देण्यात आल्याचा दावा सूर्यकांत यांनी केला. मी छत्तीसगडमधील एकनाथ शिंदे व्हावं म्हणून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साऱ्या गोष्टी करुन पाहिल्याचा दावा सूर्यकांत यांनी केला आहे.
सूर्यकांत यांनी डॉ. रमण सिंह या साऱ्या प्रकरणाला राजकीय रंग देत आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवस आपल्याला सुखाने झोपू दिलं नाही. आपला मानसिक छळ करण्यात आल्याचा दावा सूर्यकांत यांनी केला. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या सचिवालयामधील उपसचिव सौम्या चौरसियाचं नाव तुमच्या कोळसा उद्योगाशी संबंधित आहे असं दाखवावं, यासाठी आपल्यावर दबाव निर्माण केल्याचा आरोप सूर्यकांत यांनी केलाय. सौम्या चौरसिया आणि सूर्यकांत यांचे कौटुंबिक संबंध असून याच कारणामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचंही सांगितलं जातंय. रायपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सूर्यकुमार यांनी हे आरोप केलेत.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूर्यकुमार यांना तुमच्या कोळसा उद्योगाशी सौम्या चौरसियांचं नाव जोडलं तर आम्ही तुम्हाला छत्तीसगडचे एकनाथ शिंदे करु, अशी ऑफर दिली. सूर्यकांत यांनी आण केवळ एक उद्योगपती असल्याचं या अधिकाऱ्यांना सांगितल्याचा दावा केलाय. यानंतर अधिकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही सूर्यकांत यांनी केलाय. आपण मेहनत करुन इथपर्यंत आलोय. मेहनत करुन यशस्वी होणं हा काही अपराध नाहीय, असं आपली बाजू मांडताना सूर्यकांत यांनी म्हटलंय.
छत्तीसगडमध्ये आयकर विभागाने ३० जून रोजी कोळसा परिवहन आणि त्यासंदर्भात व्यवसाय असणाऱ्या सूर्यकांत यांच्या उद्योगसमूहावर छापेमारी केली होती. यावेळेस आयकर विभागाने ९ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम आणि साडेचार कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त केल्या होत्या. याशिवाय कोट्यावधी रुपयांच्या करचोरीचाही खुलासा करण्यात आला होता. या साऱ्या प्रकरणामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबरच कोळसा उद्योजक सूर्यकांत तिवारी यांचं नाव समोर आलं होतं.
काँग्रेसचे नेते सुशील आनंद शुक्ला यांनी सूर्यकांत यांच्या दाव्यांवरुन भाजपा कशाप्रकारे सरकार पाडण्यासाठी धडपड करत आहे हे उघड होत असल्याचा टोला लावला असून भाजपाचे प्रवक्ते संजय श्रीवास्तव यांनी भूपेश बघेल यांच्या सांगण्यावरुन हा कट रचण्यात आल्याचा दावा केलाय. एकंदरीतच भाजपच्या केंद्र व नेतृत्वाला काँग्रेसमुक्त नव्हे तर विरोधी पक्ष मुक्त भारत करायचा आहे, त्यानुसारच तामिळनाडू ,तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश ही बिगर भाजपशासित राज्य भाजपच्या ऑपरेशन कमळच्या रडावर असल्याचे समजते.