महाराष्ट्रात तिसरी 'शिवसेना'
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्याने दोन शिवसेना निर्माण झाल्या आहेत. त्यावर वाद सुरु असतानाच राज्यात तिसऱ्या शिवसेनेचा जन्म झाला आहे.
देशाच्या राजकारणात मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ 'शिवसेना' हा शब्द केंद्रस्थानी राहिला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे अशा दोन गटांमध्ये शिवसेना (Shivsena) विभागली गेली. आजमितीस तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेवरच आपला हक्क सांगितलाय. आता सध्या शिवसेना कुणाची हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, त्याआधीच महाराष्ट्रात तिस-या शिवसेनेनं जन्म घेतलाय. (Maharashtra Political Crises)
मुंबई आणि ठाणे इथूनच शिवसेना मोठी झाली. याच ठिकाणी शिवसेनेला सत्तेची पहिली चव चाखायला मिळाली. त्यानंतर हळूहळू शिवसेना महाराष्ट्रात पसरली. अनेकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत इतर पक्षांची कास धरली. शिवसेनेतलं सगळ्यात मोठं बंड झालं ते जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या रूपानं आणि शिवसेनेच्या अस्तित्वावरच शिंदे गटानं प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. याच ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं तिसरी शिवसेना निर्माण झालीय.
डोंबिवलीतल्या वाडकर कुटुंबियांच्या घरी कन्यारत्न जन्मलं. मुलीचं नाव ठेवण्याच्या आदल्या रात्री पांडुरंग वाडकर यांच्या स्वप्नात दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आले होते. स्वप्नात बाळासाहेब ठाकरे आणि पांडुरंग यांच्यात संवाद झाला. बंडखोरीसंदर्भात दोघांमध्ये संवाद झाला. त्यावर बाळासाहेब पांडुरंग यांना म्हणाले की, जे सत्य आहे ते होईल, त्याची काळजी करू नकोस, शिवसेना तुझ्या घरात आली आहे". स्वप्नातील या संवादानंतर वाडकर दांपत्यानं आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीचं नामकरणचं 'शिवसेना' केलं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात तिसरी शिवसेना जन्माला आल्याची चर्चा सध्या डोंबिवलीत सुरू झालीय.