राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद, नाना पटोले यांचे गंभीर आरोप, EDची राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात सुरू असलेली कारवाई, या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शनिवारी सकाळी ही भेट झाली. या भेटीचा फोटो PMOने ट्विट केला. जवळपास एक तास या दोघांची चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल उत्सुकता आहे. राज्यातील अस्थिरता, चीनसोबत वाढलेला तणाव, राष्ट्रपती पदाकरीता शरद पवारांच्या नावाची चर्चा, सोमवार पासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. पण नेमकी कशावर चर्चा झाली याचे तर्कवितर्क आता लढवले जात आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे कारण सांगितले आहे. ते सोलापूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते. या दोन्ही नेत्यांची भेट ही राज्यातील सहकारी बँकांच्या संदर्भात झाल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सहकारी बँकांबाबत रिझर्व्ह बँकेला योग्य ते आदेश द्यावे या मागणीसाठी शरद पवार यांनी ही भेट घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. शरद पवार यांना देशभरातील सहकार क्षेत्रातील लोकांनी संपर्क साधून त्यांना येत असलेल्या अडचणींची माहिती दिली. त्याच मुद्द्यावर ही भेट असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच चीनच्या विषयावरही ही भेट झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.