आता तरी राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत निर्णय घ्यावा - राष्ट्रवादी
मुंबई – १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यपालांना सूचित केले आहे. राज्यपालांनी राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, असे कोर्टाने म्हटले आङे. त्यामुळे आता राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील व १२ आमदार नियुक्त करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी हायकोर्टाने निकाल दिला. घटनात्मक पदावरील व्यक्तीला आदेश देऊ शकत नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले. यावर बोलताना नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
राज्यसरकारने मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार विधानपरिषदेवर १२ आमदारांची नावे निश्चित करून प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. त्याला आता ९ महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्याप राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांनी किती वेळेत याचा निर्णय घ्यावा यावर कायद्यात तरतूद नाही, मात्र राज्यसरकारच्या मंत्रीमंडळात एखादा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्याचे काम राज्यपालांचे असते आणि ते त्यांना बंधनकारक आहे अशी कायद्यात तरतूद आहे असेही नवाब मलिक म्हणाले. मात्र असे असताना याचा गैरफायदा घेत राज्यपाल अनिश्चित काळासाठी १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवत आहेत हे योग्य नाही असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
हायकोर्टाने सूचित केल्यामुळे राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील. दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे हे कोर्टाचे म्हणणे आहे. निश्चितरुपाने समन्वय असला पाहिजे, परंतु त्या पदावर बसलेला व्यक्ती संविधानिकपदी असतो, त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव नसावा, राज्यपाल हे राजकीय पक्षाचे व्यक्ती नाही याचे भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे असे स्पष्ट मतही नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.