"पंकजा मुंडेंच्या धर्मयुद्धात शकुनी मा.मु" राष्ट्रवादीचा टोला

Update: 2021-07-14 07:05 GMT

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपली पक्षातील घुसमटही व्यक्त केली. आपल्याला धर्मयुद्ध टाळायचे आहे आणि पांडवांनीही तसाच प्रयत्न केला होता, असे त्यांनी म्हटले आहे. यातून पंकजा यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते आहे. पण पंकजा यांनी आपण पांडव आहोत असे म्हटले तर मग कौरव कोण असा सवाल विचारला जातोय. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला कोंडीत पकडण्याची संधी साधली आहे. त्यांनी एक ट्विट करुन भाजपला टार्गेट केले आहे.

"ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. "नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका."



अमोल मिटकरी यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी, सहन होईल तोपर्यंत सहन करुन नाही तर योग्य वेळ आल्यास निर्णय घेऊ, असे सांगत पुढीला दिशा काय असू शकते असे संकेत दिले आहेत. पंकजा यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरील नाराजीही अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. आपण पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी असल्याने आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे.पी.नड्डा हेच असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे यात राज्याचा विषय नसल्याचे सांगत फडणवीस यांचे नाव नेते म्हणून घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन त्यांची फडणवीस यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा आहे.

Tags:    

Similar News