'तीस-तीस' घोटाळ्याच्या मास्टरमाइंड संतोष राठोडचं राष्ट्रवादी-शिवसेना कनेक्शन?

Update: 2021-11-17 08:34 GMT

मराठवाड्यात खळबळ उडवून देणाऱ्या 'तीस-तीस' घोटाळ्यात मुख्य सूत्रधार संतोष राठोडवर गुन्हा दाखल झाला असून, सद्या तो फरार आहे. मात्र संतोष राठोडला वाचवण्यासाठी आता राजकीय नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचं बोलले जात असून, हे राजकीय नेते कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जेव्हा-जेव्हा एखाद्या मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर येतो त्या-त्या वेळी अशा घटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप नेहमीच पाहायला मिळतो. असंच काही आता 'तीस-तीस' घोटाळ्यात पाहायला मिळत आहे. यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेतेमंडळी मध्यस्थी असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.

'तीस-तीस' प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता गुंतवणूक करणारे आता समोर आले आहेत.

ज्यात राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण आणि शिवसेना नेते कृष्णा चव्हाण यांचा सुद्धा यात सहभाग असल्याचा आरोप 'तीस-तीस' गुंतवणूक करणाऱ्या नितीनचव्हाण यांनी केला आहे.

या आरोपाची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही विजय चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता,"माझा 'तीस-तीस'चा काहीच संबंध नसल्याचं त्यांनी म्हंटले आहे. तर कृष्णा चव्हाण यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

'तीस-तीस' घोटाळा म्हणजे काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याच काम या तरुणाने केलं.

काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 8 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.

Tags:    

Similar News