एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना आवाहन करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. बंडखोर आमदारांनी २४ तासात महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी केली तर त्यांच्या मागणीवर विचार होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
त्यांच्या या घोषणेवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे. "महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे."
महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 23, 2022
असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेच्या या घोषणेबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.