पुणे : सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या खासगी जीवनाबद्दलच्या पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल असाच प्रश्न उपस्थित केला आहे. त्या विडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.
पण आता चित्रा वाघ यांच्या ट्विटवरुन त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. "उद्या तुम्ही ब्लु फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि याच उत्तर मागाल, असे कुठे करतात का चित्राताई? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला आहे.
मुळात एखाद्या नेत्याच्या खासगी आयुष्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विट करण्याचा हेतू काय असा सवाल ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. तो तथाकथित व्हिडीओ खरा आहे खोटा आहे त्याची पडताळणी केली का, त्या महिलेने तुम्हाला कोणती तक्रार केली का? असे सवाल उपस्थित करत रुपाली ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांना सुनावले आहे.