आम्ही पुन्हा येणार, शिंदे सरकार संकटात असल्याने राष्ट्रवादीची तयारी?
शिंदे सरकार कायदेशीर पेचात अडकल्याने धोक्यात आले आहे का, विरोधक पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयारी करत आहेत का, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झाले आहेत.
मी पुन्हा येणार हा शब्द राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आम्ही पुन्हा येणार असा दावा त्यांनी केला आहे. सत्तेत निश्चित येणार आहोत, पण ते कधी हे आता सांगणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील दोन जणांचे सरकार हेच ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत बोलताना जयंत पाटील यांनी दावा केला आहे की, शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार हे अपात्र ठरणार आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयाने परिशिष्ट दहावर शिक्कामोर्तब केले तर न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे. दोन तृतीयांश आमदारांच्या बहुमताचा मुद्दाच नाहीये, कारण शिंदे गटाने स्वतंत्र गट स्थापन न केल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षविरोधी कारवाई केल्याने ते अपात्र ठरणार आहेत, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.
त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते, ते आदेश देखील बेकायदेशीर असल्याचा दावा जयंत पाटील यांना केला आहे.