भोसरी जमीन प्रकरण : अखेर खडसे EDच्या चौकशीला हजर

Update: 2021-07-08 12:08 GMT

पुण्यातील भोसरी येथील भुखंड खरेदी प्रकरणी अखेर एकनाथ खडसे चौकशीसाठी EDच्या कार्यालयात पोहोचले आहेत. दोन दिवसांपूर्वी ED ने खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना याच प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी खडसे यांना इडीने समन्स बजावले. पण त्यानंतर खडसे यांनी गुरूवारी ११ वाजता होणारी पत्रकार परिषद प्रकृतीच्या कारणास्तव रद्द केली. त्यामुळे खडसे EDच्या चौकशीला हजर राहतील की नाही, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. पण अखेर गुरूवारी दुपारी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात पोहोचले.

आपण भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने केवळ सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप खडसेंनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. एवढेच नाही तर भोसरी येथील जमीन MIDCची नव्हतीच तो खासगी व्यवहार होता, असे सांगत खडसे यांनी सर्व आरोप फेटाळले. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आणि दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे खडसेंच्या चौकशीनंतर ईडी काय कारवाई करते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे भोसरी जमीन प्रकरण?

भाजप शिवसेना युतीचे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना एकनाथ खडसे यांच्याकडे 12 खाती होती त्यात महसूल खातही होते. याच दरम्यान भोसरी MIDC मधील भूखंड खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसें आणि जावई गिरीश चौधरी यांनी कोलकाता येथील व्यक्ती कडून जमीन खरेदी करतांना ती नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्याचा आरोप आहे. यात साडे तीन कोटींचा झालेला आर्थिक व्यवहारही संशयास्पद असल्याची तसेच एकनाथ खडसेंनी आपल्या पदाचा गैरवापर करत सरकारी यंत्रणेचा वापर करून या व्यवहाराला मदत केली, असा आरोप आहे. याबाबत पुणे येथील व्यवसायिक हेमंत गावंडे यांनी तक्रार केली , त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ह्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण चांगलंच गाजल्याने खडसेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला . तसेच ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती. आता हेच प्रकरण खडसेंच्या मानगुटीवर आहे.

Tags:    

Similar News