म्हणे आमच्या दोन आठवड्याच्या सरकारने मिळवल ओबीसी आरक्षण, अनिल गोटेंचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
20 जुलै ला सर्वोच्च नायायालयाने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण दिलं आणि या सगळ्याचं श्रेय नव्या सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलं. पण तस नसून ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीने मिळवून दिल्याचं राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी म्हटल आहे. त्यांनी तशा आशयाचं पत्रच ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
गेल्या अनेक काळापासून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाव यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढला होता. या ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. परिणामी तत्कालीन सरकारला या ठिकाणी प्रशासक नेमावे लागले. जो इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यावरून तत्कालीन सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप करत होते. तो डेटा अखेर सादर केला गेला आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले.
पण आता यावरून विद्यमान सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात श्रेयाची लढाई सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारमुळे हे आरक्षण मिळाल्याचं सांगत आहेत पण त्याच्यावर आता पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी विधानपरिषद सदस्य अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणविस यांच्यावर अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. दोन आठवड्याच्या सरकारमुळे आरक्षण मिळाले नसून ते महा विकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांमुळे मिळाल्याचं ते आपल्या पत्रात म्हणतात. या शिवाय त्यांनी देवेंद्र फडणविस यांच्यावर आणखी काही आरोप केले आहेत. नेमकं काय म्हणाले आहेत अनिल गोटे पाहुयात, "आजपची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे. एखाद्या राजकीय पक्षाची अशी केविलवाणी अवघडलेली स्थिती देशाच्या राजकारणात क्वचिच झाली असावी. आजपमध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची अगतिकता एवढी शिगेला पोहोचली आहे की मना विरुद्ध घडले तर शरद पवारांमुळेच घडले आणि जनतेच्या हिताचे घडले तर आमच्या मुळेच श्रेय घेताना दरवेळी वेळ काळ याची सुद्धा बंधने यांना तोकडी पडतात..
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबद्दल प्राथमिक गोष्टींची पूर्तता करायला हवी होती, परंतु जाणून बुजून, समजून उमजून केली नाही. गरीब बिचाऱ्या धनगरांना तर हातोहात बनवले. समाजाचे नेते राम शिंदे मंत्री झाले पण निर्णयस्वातंत्र्य नाही. झालो तर पंतप्रधानच नाहीतर काहीच नको म्हणणाऱ्या महादेव जाणकारांना विधान परिषद देण्यासाठी दाताच्या कण्या कराव्या लागल्या नंतर मंत्रिपदासाठी उंबरठे झिजवायला लागले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगरांना नादी लावण्याचे काम करीत विदर्भातील विशेषतः नागपुरातील डा विकास महात्मे यांना राज्यसभा देऊन मापात कापून ठेवले. थोडक्यात म्हणजे आरक्षणाचा लाभ मागासवर्गीयांना होता कामा नये. राजकारणात आपल्या खुर्चीला खुर्ची लावून मागास वर्गीयांनी बसू नये अशा उच्च वर्णीय क्षुद्र मनेवृतीतून ओबीसी, धनगर, मराठा समाजाला घटनात्मक सवलती डावलून जितके दूर नेता येईल तेवढे दूर नेले.
अर्थात हा त्यांचा दोष नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे बाळकडूच असे आहे की, मागास वर्गीयांना मिळणारे आरक्षण संपुष्ठात आणले पाहिजे. मी स्वतः सलग अर्धा तक संघ विचाराच्या परिवाराचा सदस्य होतो. संघ परिवारात होतो. माझ्या बंडखोर स्वभावाचे काही घडे शिकविण्याचे नियतीने माझ्यावर सोपविलेले काम होते ते ईश्वरी कार्य भी पार पाडलेच. कुणालाही दबलो नाही, जुमानलेही नाही. देवेंद्र फडणवीसांना मी कायम लाखोली वाहत असतो. त्यांच्या बद्दलचा माझा स्वानुभव आहे. भाजपमध्ये असताना सुद्धा त्यांना सुनवायला कमी केले नाही.
लवकरच एक पुस्तक प्रसिद्ध करणार आहे. त्यांत सर्व परामर्ष येईलच. देवेंद्र फडणवीसांनी अतिशय शुल्लक कारणासाठी माझी फसवणूक केली. त्यांच्या बालिश अन् हलक्या कानाच्या दोषामुळे विधानसभेचा आठ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो, असो.
वरील सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची वर्तवणूक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब एक म्हण वापरत असत त्याची आठवण झाली, "पोरगा झाला देशावर आणि भैय्या नाचतो पारावर". एकीकडे शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन जुम्मा- जुम्मा १५ दिवसही झाले नाहीत तर स्वतः केल्याचे म्हणवताहेत, तर दुसरीकडे अशी स्थिती होती महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी प्रचंड कष्ट उपसले होते. बांठिया आयोगाची स्थापना केली. त्यांनी सर्वेक्षण करून अहवाल तयार करायला लावला. सर्वोच्च न्यायालयाने तो स्विकारला आणि महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाची लढाई जिंकली.
घटनेचा क्रम पाहता एखाद्या महिलेने प्रसुतीसाठी दवाखान्यात दाखल व्हावे तिला पुत्ररत्न प्राप्त व्हावे. खरे तर पुत्र प्राप्तीचा आनंद बापाचा आहे, साहेब तुम्हाला पुत्र प्राप्त झाला असा निरोप घेऊन येणारा प्रसुतीगृहाचा वाडा नाचतोय. यालाच म्हणतात "करून गेलं गाव अन् कांदेकरांचं नाव" अरे मनाची नाही पण जनाची तरी थोडी लाज बाळगा तुमच्या प्रसुतीगृहात मूल झालं म्हणजे तुमचं पितृत्व नव्हे पण भाजपचे सध्याचे नेते म्हणजे कुछ ना करो लेकीन अपना बोलो" अशा अवस्थेत आहेत.
देशात काही अघटीत घडले की नरेंद्र मोदी ५६ वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या जवाहर नेहरूंना दोष देतात. त्यांचेच प्रिय शिष्य मागे कसे असतील ते शरद पवारांचे सुद्धा नाव घेतात. शरद पवारांना जबाबदार धरण्याच्या अंगवळणी पडलेल्या सवयीमुळे अनावधानाने कदाचित भाजपमधील एखाद्याच्या पितृत्वासाठी शरद पवारांना जबाबदार धरू नये म्हणजे मिळवली." असं म्हटलं आहे.