प्रविण दरेकरांवर फौजदारी संहितेनुसार कारवाई करा ;नवाब मलिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...
मुंबै बॅंकेचे संचालक प्रविण दरेकर यांच्यावर फौजदारी संहितेनुसार कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
या पत्रात नवाब मलिक यांनी
प्रविण दरेकर यांना सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांनी ३ जानेवारी २०२२ रोजी मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे. प्रविण दरेकर हे मजूर या संवर्गाची अर्हता धारण करत नाही तथापि ते मागील अनेक वर्षांपासून संचालक व अध्यक्ष म्हणून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काम करत आहेत. प्रविण दरेकर यांनी फसवणूक करुन सदस्यता मिळवलेली असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७८ अ नुसार ते पुढील एक वर्षासाठी कोणत्याही प्रवर्गातून सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ठरत नाहीत. त्यामुळे प्रविण दरेकर यांनी केलेल्या फसवणूकीसाठी त्यांच्यावर भारतीय फौजदारी संहिता मधील कलम १९९, २००, ४२० व ३७ तसेच अन्य उचित कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पत्रात केली आहे.
या पत्राच्या प्रती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिल्या आहेत.